Header Ads

Loknyay Marathi

सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शेतकरी मेळावा, कृषिप्रदर्शन व परिसंवाद संपन्न

निसर्गाशी मिळती जुळती शेती केली पाहिजे - मा. राजाराम माने

निसर्गाशी आम्ही फारकत घेतल्यामुळेच शेती व्यवसायापुढे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इथून पुढच्या काळात शाश्वत शेती विकासासाठी  निसर्गाशी मिळती जुळती शेती केली पाहिजे त्यासाठी तरुणाईने पुढे आले पाहिजे त्याशिवाय खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही, असे मत जेष्ठ शेती तज्ञ माजी प्राचार्य मा. राजाराम माने यांनी व्यक्त केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह व मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा, कृषीप्रदर्शन व परीसंवाद महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता विभाग, माजी विद्यार्थी संघटना, रोटरी क्लब ऑफ सांगली, मिडटाऊन इनरव्हील क्लब सांगली मिडटाऊन सनराईस  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. प्रारंभी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थितांचे स्वागत शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले, कृषीप्रदर्शन व परीसंवाद आयोजित करण्याची प्रेरणा आम्हाला मा. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेतून मिळाली. इथुनपुढे दरवर्षी महाविद्यालयात कृषी प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येईल. पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय ठिगळे यांनी करून दिला उपस्थितांचे आभार प्रा. टी. आर. सावंत यांनी मानले.

मार्गदर्शनपर भाषणात माजी प्राचार्य मा.राजाराम माने म्हणाले की, नवनिर्मिती करण्याचे कार्य साहित्यिक व शेतकरी करतो. परंतु जमिनीचा कस कमी होत चालल्यामुळे शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला पाहिजे त्यासाठी तरुणाईने पुढे आले पाहिजे तरच शेती क्षेत्रात क्रांती होईल. शाश्वत विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी कार्य करण्याची गरज आहे.

अध्यक्षिय भाषणात प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, माती व शिक्षण याचे अतूट नाते जोडण्याचे कार्य डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने केले आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. 

कार्यक्रमात प्रयोगशील व आदर्श शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास  रोटरी क्लब ऑफ सांगली, मिडटाऊन इनरव्हील क्लब सांगली मिडटाऊन सनराईस चे पदाधिकारी सौ. कविता पवार व श्री. सुशीलकुमार बियाणी, प्रा. डॉ. प्रभा पाटील, डॉ. अमित सुपले त्याबरोबरच परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इंद्रजीत माने यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषी प्रदर्शनात परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट  दिली.

(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)