Header Ads

Loknyay Marathi

अशैक्षणिक कामे बंद : शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची घोषणा

अशैक्षणिक कामे बंद: शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा

'जहाजांच्या कप्तानाकडून आम्ही गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना इतर कामात गुंतवून ठेवता. मग अपेक्षेप्रमाणे काम नाही म्हणून नाराजही होतो. तसे काहीसे आपल्या शिक्षकांच्या बाबतीत झाले आहे. शिक्षकांना २५० अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे. मुळात शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ते आम्ही आता टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत', असे सांगत, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना दिलासा दिला.

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने सायन येथे मुख्याध्यापक भवनात वर्षा गायकवाड यांचा अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मी स्वत: शिक्षिका असल्याने मला शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांची जाण असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सुरुवातीलाच सांगितले. 'येत्या काळात आम्हाला शैक्षणिक दर्जा सुधारायचा आहे. यासाठी आम्ही लवकरच मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. तो प्रश्नही लवकरच मार्गी लावू', असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शिक्षकांनी त्यांचे प्रश्न इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चर्चेने सोडवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, दिलशाद थोबानी, सचिव प्रशांत रेडीज यांच्या हस्ते खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक भास्करराव बाबर व महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते मुंबई विभागातील प्रत्येक वॉर्डमधील एक गुणवंत मुख्याध्यापक अशा १७ उत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, सेवानिवृत्त सदस्य, माजी अध्यक्ष, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व इतर बिगरराजकीय संस्थाचालक, शिक्षक संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

या मुद्द्यांवर चर्चा:

- २० टक्के अनुदान शाळांना प्रचलित नियमानुसार मिळावे.

- आदिवासी उपाययोजनेअंतर्गत असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळावे.

- अंशत: व विनाअनुदान तत्त्वावर १ नोहेंबर २००५ पूर्वी व नंतर कार्यरत शिक्षकांना जुने निवृत्तीवेतन मिळावे.

- २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट मिळावी व सेवा सुरक्षा आणि पगार सुरू व्हावा.

- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, शाळा तेथे ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक असावेत.

- अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, बीएलओ ड्युटी न घेतलेल्या शिक्षकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत.

- शैक्षणिक धोरण ठरवताना मुख्याध्यापक संघाला विश्वासात घेणे.

- वेतनेतर अनुदानामध्ये वाढ व्हावी.

- शालार्थ वेतन प्रणालीमध्ये नावे लवकरात लवकर समाविष्ट होऊन शिक्षकांना पगार मिळावेत.

- शासकीय कार्यालयांमधील प्रलंबित कामांना गती मिळावी.