Header Ads

Loknyay Marathi

महापूरातील महाविद्यालय : डॉ.डी.जी.कणसे

महापूरातील महाविद्यालय : डॉ. डी. जी. कणसे

सांगली | २०/८/२०१९


सांगली  शहर हे महाराष्ट्र "हळदीचे शहर" म्हणून जसे ओळखले जाते तसे ते 'उत्तम शैक्षणिक सुविधायुक्त शहर' म्हणूनही नावारूपास आले आहे. कृष्णा खो-यात असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरी असलेल्या या सांगलीच्या ऐलतीरावर सांगली शहर तर पैलतीरावर सांगलीवाडी हे उपनगर आहे. दोन्हींच्यामधून संथ वाहणारी कृष्णामाई. या दोन्ही तीरांना जोडणारा शंभर वर्षे आयर्विन पुल ! सांगलीवाडी शहराचे उपनगर असले तरी आपली ग्रामीण बाजू सांभाळून शहरी खानाखूणा आंगा खांदयावर खेळविणा-या या सांगलीवाडी उपनगरात ८ जानेवारी १९९९ मध्ये स्वत:च्या देखण्या इमारतीत स्थलांतरीत झालेले भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय ! ऑगस्ट २०१९ च्या महाप्रलयकारी महापुराने वेढलेले तरीही जवळपास चार हजार पुरग्रस्तांना आपल्या पंखाखाली घेवून, मायेची उब देवून जलप्रलयाने त्यांच्या मनावर झालेल्या जखमांवर हळूवार फुंकर घालून 'मानवते' चे दर्शन घडविणारे आमचे महाविद्यालय आपत्ती व्यवस्थापनाचे एक साधनही बनले. त्याच महापुरात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची ही कहाणी !

असे म्हटले जाते की, राष्ट्राच्या व समाजाच्या उभारणीत महाविद्यालये व विद्यापीठे यांचे योगदान अनन्य साधारण असते. होय, संस्था व महाविद्यालये ही केवळ भिंती असलेली इमारत नसून माणूस घडविण्याची कार्यशाळा असते. या माणूस घडविण्यातूनच कुटुंब, गांव, समाज आणि राष्ट्राची निर्मिती होते. माणूस घडविणे म्हणजेच तरूण युवा पिढी, तरूणाई तयार करणे होय. जे देश आपल्या तरूणाईला पध्दतशीर घडवून त्यांचा योग्य दिशेने उपयोग करतात तेच देश अधिक विकसित होत जातात. ही तरूणाई त्या देशाची संपत्तीच असते. याची जाणीव भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांना होती, म्हणूनच त्यांची जडणघडण भारती विद्यापीठाच्या माध्यमातून करून त्यांचा राष्ट्र विकासामध्ये व व्यवस्थापनामध्ये उपयोग करून घेतला. विशेषत: २००५ मध्ये आलेल्या महापुरात मा. साहेबांनी सरकारी यंत्रणा तर कामाला लावलीच पण भारती विद्यापीठातील या तरूणाईची उर्जा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामी आणली. २०१९ च्या प्रचंड महापुरावेळी मा. साहेबांचा हाच वारसा भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.आ. डॉ. विश्‍वजित कदम यांनी गिरविला. याच भारती विद्यापीठाची एक शाखा म्हणजे आमचे महाविद्यालय होय. या महाविद्यालयाने २०१९ मध्ये पहिल्यांदा महापुराचा स्वत:भोवती पडलेला विळखा अनुभवला अन्‌ सांगलोवाडीच्या संसार उध्वस्त झालेल्या हजारो नागरीकांना आपल्या कुशीत घेवून त्यांचे अश्रु पुसण्याचा अनुभव देखील घेतला.

 त्याचे असे झाले - १ ऑगस्ट पासून पाऊसाचा जोर वाढत चालला होता. हळूहळू दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदीपात्राच्या बाहेर पडून जवळपासची घरे, शेती, पिके, गांवे, शहरे कवेत घेऊ लागली. त्याचवेळी भिलवडी आणि परिसरात महापुराने हैदोस घालायला सुरूवात केली होती. मा.आ. डॉ. विश्वजित कदम यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता पुरग्रस्तांना धीर देत मदतीसाठी महापुरात उडी घेतली होती. पुरग्रस्तांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून भारती विद्यापीठ शाळांच्या इमारतीमध्ये त्यांच्या निवासाची खाण्यापिण्याची पुरेपूर व्यवस्था केली होती. खरतर २००५ मधील महापुराच्या अनुभवानुसार पुर येईल आणि ओसरेल असा लोकांनी तक केला नि ते गाफील राहिले. पण पाणी ओसरण्याऐवजी ते वाढू लागल, पाणी घरा घरात गेले व लोक गच्चीवर गेले, मात्र पाणी वाढतच राहिले. तोपर्यंत माध्यमातून नुसती चर्चा होत राहीली. परंतु ब्रम्हनाळ गांवात बोट उलटून १७ जणांचा बुडून मृत्यु झाला तेव्हा साऱ्या देशात हाहा:कार माजला. जगाच्याही नजरा या प्रलयकारी महापुराकडे वळल्या.

दरम्यान, सांगलीमध्येही कृष्णेने आपले रौद्ररूप धारण केले होते. नेहमी सारखी पुर रेषा ओलांडली की पाणी ओसरेल असे समजून सांगलीकर देखील निर्धास्त राहिले. पण तसे घडले नाही. २००५ मधील पुर पातळी ओलांडून वाढतच राहीली.मग मात्र सांगलीकर धास्तावले. अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे हजारोंचे संसार वाहून गेले. लाखो लोक उध्वस्त झाले. गांवे, शहरे, पिके, गुरे-ढोरे या सा-यांनाच या अभुतपुर्व उच्चांकी महापुराने पाहता पाहता कवेत घेतले. 

महाविद्यालय असलेल्या सांगलीवाडी परिसरात मोठी विचित्र आणि आणिबाणीची परिस्थीती उद्‌भवली होती. पुराच्या पाण्याने संपूर्ण भाग जलमय झाला होता. पुण्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले होते. लोकांना बाहेर पडण्याचा एकही मार्ग आता उरला नव्हता. घरातील सामान शक्‍य तेवढया उंचावर ठेवून लोक घराबाहेर पडू लागले. पण जाणार कुठे? शेवटी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व वर्ग, खोल्या उघडून देण्यात आल्या. २००५ च्या पुरात सुरक्षित राहिलेली इमारत या पुराने मात्र पुर्ण कवेत घेतली होती. तथापि चार मजली प्रशस्त इमारतीमुळे लोकांना निवारा मिळाला. राहण्याची सोय झाली पण पाणी आणि वीज यांचे काय ? वीजेचा पर्याय नव्हताच. मात्र लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे खाद्य सामुग्री व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. महाविद्यालयाच्या मुकुटावर घिरटया घालणा-या हेलिकॉप्टरमधून मदतीचे साहित्य टेरेसवर टाकण्यात आले. पुरामुळे सांगलीतून महाविद्यालळयाकडे जाणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे विविध चित्र वाहिन्यावरून जीवंत दृष्ये पाहवी लागली. तरीही सुरूवातीला एक दिवस धाडस करून बोटीने जावून मी व सहका-यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. महाविद्यालयाच्या इमारतीसमोर असणा-या ज्या प्रांगणातून विद्यार्थी - प्राध्यापक ये जा करतात तिथे पुरग्रस्तांनी इमारतीत जाण्यासाठी चक्क बोटीचा वापर केला. यावरून महापुराची भिषणता लक्षात यावी. गेल्या शंभर वर्षात असा महापुरात कधी पाहिला नाही कि ऐकला नाही, असे देखील वृध्द व जाणकार सांगतात. महापुर ओसरल्यावर पाण्याच्या महापुरामुळे झालेल्या समस्यांचा महापुर हाताळण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. महाविद्यालयात पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले. 

महाविद्यालयाबरोबर शिवाजी विद्यापीठानेही यामध्ये आघाडी घेतली. मा. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, मा. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.शिके यांनी सांगली जिल्हयातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आमच्या महाविद्यालयात आयोजित केली. त्यामध्ये विद्यापीठाने स्वच्छता, साफसफा्ड इत्यादी कामे हाती घेणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे, पुरबाधीत महाविद्यालयांना आर्थिक मदत करणे यासंबंधी तातडीने पाऊले उचलण्याचे ठरले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात संपन्न झालेल्या सभेत पुरग्रस्तासाठीच्या निर्णय प्रकियेत व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून मलाही सकीय सहभाग नोंदविता आला.

महापुराने होणारे नुकसान कधीही भरून निघत नाही हे जरी खरे असले तरी सांगलीवाडीतील हजारो लोकांचीससेहोलपट केवळ महाविद्यालयामुळे थांबविता आली. महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय होत असताना “बुडत्याला काडीचाआधार ? या न्यायाने हे विद्यामंदीर सांगलीवाडीतील पुरग्रस्तांसाठी “जीवनदान मंदीर' ठरले. या जल प्रलयादरम्यान भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा  मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब या देखील खूप आस्थेने पुरपरिस्थीचा वेळोवेळी आढावा घेवून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी योग्य त्या सुचना देत राहिल्या. त्यामुळेच मध्यंतरी महाविद्यालयात एका कार्यकमासाठी मा.वहिनीसाहेब आल्या असताना सांगलीवाडीतील गोरगरीब ग्रामस्थांनी आवर्जुन त्यांची भेट घेतली आणि “वहिनीसाहेब, तुमच्या या महाविद्यालयाच्या इमारतीमुळेच आमचे व आमच्या लेकराबाळांचे जीव वाचले.”अशी कृतज्ञता व्यक्‍त केली.

गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या आणि मानव ही जात आणि मानवता हा धर्म अंगीकारलेल्या मा. साहेबांचे नांव धारण केलेल्या आमच्या महाविद्यालयाने मानवतेचे आनोखे दर्शन या निमित्ताने घडविले. मा. साहेबांचा हा वसा आणि वारसा भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.आ.डॉ. विश्‍वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महाविद्यालय यापुढेही सदैव चालवित राहील हे नि:संशय !

(Sangli Flood 2019)
(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)