महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली (Maharashtra 2 child get National Bravery Award) आहे. यात महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादच्या आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. झेन सदावर्ते या 12 वर्षाच्या मुलीने आगीत अडकलेल्या 17 जणांना बाहेर काढलं होतं. तर आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीची सुटका केली होती.
देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा 22 जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.
झेन सदावर्ते कोण?
झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी 22 ऑगस्ट 2018 रोजी बुधवारी सकाळी मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीत आग लागली होती. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 18 जण जखमी झाले. यात झेनच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 17 जणांचा जीव वाचला होता.
गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहत होते. अचानक लागलेल्या आगीच्या प्रसंगी लहानग्या झेनने आपल्या आईवडिलांना शांत केले. त्यानंतर प्रसंगावधान राखत घरातील सुती कपडे ओले केले आणि ते नाकाशी धरुन शांतपणे श्वास घेण्यास सांगितले.
झेन डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत शिकते. शाळेत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे दिले जातात, याचाच तिने योग्य पद्धतीने वापर केला. आईवडिलांसह जवळपास 15 जणांना तिने बाल्कनीत बसवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने हे सर्व बाहेर आले.
मायलेकीचा जीव वाचवणारा आकाश खिल्लारे
तर आकाश खिल्लारे या शाळकरी मुलाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता 70 फूट खोल नदीत बुडणाऱ्या मायलेकीचा जीव वाचवला होता. आकाश औरंगाबादच्या हातमाळी या छोट्याशा गावात राहतो. शाळेत जात असताना गावातील नदीचा बंधारा ओलांडताना त्याला एक लहान मुलगी आणि बाई पाण्यात बुडताना दिसल्या. आकाशने कसलाही विचार न करता, पाठीवरून दप्तर काढून थेट नदीच्या डोहातही उडी मारली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या बुडणाऱ्या मायलेकींना वाचवलं होतं.
राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे नेमकं स्वरुप काय?
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील 16 वर्षाखालील 25 शूर बालकांना दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते. ही पुरस्कारप्राप्त मुलं प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.
Post a Comment