डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण व राष्ट्रभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या शुभहस्ते राष्ट्र-ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. (डॉ.) रणखांबे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रजासत्ताक देश असून भारतीय संविधान हे देशाच्या सार्वभौमत्वाचे व लोकशाही मूल्यांचे मजबूत अधिष्ठान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षांनी भारत सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.
ते पुढे म्हणाले, ही भारतीय राज्यघटना कोणत्याही एका व्यक्तीची नाही, ती संपूर्ण भारताच्या जनतेची आहे. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून, बलिदानातून व संघर्षातून तिचा जन्म झाला आहे. मात्र आज समाजात अन्याय घडताना आपण गप्प बसतो, दुर्लक्ष करतो. हे मौनच आज लोकशाहीसाठी सर्वात मोठे संकट बनले आहे.
राज्यघटना म्हणजे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, ती एक विचारधारा आहे. ती आपल्याला माणूस म्हणून जगायला, प्रश्न विचारायला, अन्यायाविरुद्ध उभे राहायला आणि संविधानिक मूल्यांवर ठाम राहायला शिकवते, असेही त्यांनी नमूद केले. कर्तव्य आणि राष्ट्रीय उत्तरदायित्वाची भावना ही हक्क, अधिकार यापेक्षा महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली. एन.एन.सी. विभागातर्फे मानवंदना व शिस्तबद्ध संचलन सादर करण्यात आले. या संचलनामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने भारावून गेला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. रूपाली कांबळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment