प्रा. एस. ए. गायकवाड यांना ‘प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर
प्रा. एस. ए. गायकवाड यांना ‘प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर
सांगली : प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९४ व्या स्मृतिदिनानिमित्त सोशल फोरमच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील कर्मयोगी पुरस्कार’ प्रा. एस. ए. गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. निसर्गसेवा, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, लोकरंगभूमी व्यासपीठ, शांतिनिकेतन, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक व प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमचे अध्यक्ष मा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोशल फोरमच्या वतीने देण्यात आली.
प्रा. एस. ए. गायकवाड हे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख असून त्यांनी निसर्ग व समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्य केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यातून व प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित निरीक्षणातून त्यांनी भावी पिढीला नवी दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. निसर्गसेवेच्या भावनेतून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे ते निसर्ग क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यातून समाजहिताचा विचार व सकारात्मक परिवर्तनाचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.
सोशल फोरमच्या वतीने दिला जाणारा हा राज्यातील मानाचा कर्मयोगी पुरस्कार एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व आजी-माजी प्राध्यापक, निसर्गप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या गौरवशाली कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment