डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कीर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कीर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. पतंगराव कदम यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताहांतर्गत महाविद्यालयात दोन दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भारती विद्यापीठ शालेय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष मा. श्री. मनोहर सारडा (काकाजी), रामनिकेतनचे मा. श्री. दीपक (नाना) केळकर, महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य आणि भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, भारती सहकारी बँक पुणे चे संचालक मा. डॉ. जितेश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मा. विजयमाला कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले जाते आणि संस्काराची बीजं अशाप्रकारच्या उद्बोधन कार्यक्रमातून रुजली जातात. कीर्तन संस्कृती ही समाजाला योग्य दिशा देणारी असून अशा आध्यात्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असतो.
या कीर्तन महोत्सवात पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. श्रीगुरू कृष्णा महाराज चवरे यांनी उपस्थित श्रोत्यांना भक्तिरसाची अनुभूती दिली. श्रीगुरु चवरे महाराज आपल्या कीर्तन सेवेत म्हणाले की, कीर्तन ही संतांनी समाजाला दिलेली अमूल्य देणगी आहे. कीर्तनातून भक्ती, सदाचार आणि मानवतेचे दर्शन मानवी मनावर बिंबवले जाते. शिक्षणसंस्थांनी या परंपरेचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.
या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज श्रीगुरू योगीराज महाराज गोसावी यांनी आपल्या कीर्तन सेवेतून उपस्थित श्रोत्यांना भक्तीचे महत्त्व सांगितले. जो भक्ती मार्गाचा अवलंब करतो त्याचे प्रबोधन आपोआपच होत असते. माणसाचे ध्येय नेहमी मोठे असावे. कोणतेही कार्य करण्यासाठी धैर्य असले पाहिजे. केवळ कर्माने माणूस मोठा होत नाही, त्याला भाग्याची साथ लागते त्यासाठी कर्माचा सिद्धांत सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. दोन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात कैवल्यधाम या प्रदीर्घ कीर्तन परंपरेचा विशेष सन्मान म्हणून प.पू. श्री. गुरुनाथ महाराज कोटणीस यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे म्हणाले की, कीर्तन हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची रुजवणूक होते. म्हणून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.
हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी ह.भ.प. श्री. विश्वास गवळी, मृदंगाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर आंबी, ह.भ.प. श्री. सर्वेश पाटील तसेच मा. श्री. विजय म्हैसकर, मा. श्री. महादेव विसापुरे, अभंग गायन मा. श्री. शरद गुरव आणि त्यांचे साथीदार यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक, विद्यार्थी, सांगली व सांगलीवाडी पंचक्रोशीतील भाविक, वारकरी, संत सेवा वारकरी मंडळ, महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाजप्रबोधन सप्ताहाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी सांगलीवाडी परिसरात घरोघरी रांगोळ्या काढून नागरिकांना आमंत्रित केले. याप्रसंगी महाविद्यालयातील वर्षभरातील विविध उपक्रम आणि डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृती जागृत करणाऱ्या भित्तीपत्रिकेचे अनावरण मा. विजयमाला पतंगराव कदम आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
दोन दिवस अतिशय भक्तीमय वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती भाविकट्टी, प्रा. रोहिणी वाघमारे व डॉ. रुपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अमित सुपले व डॉ. दादा नाडे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)









Post a Comment