डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने कसबे डिग्रज येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने कसबे डिग्रज येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन मा. राजेंद्र जोशी, संस्थापक – निसर्ग संवाद संस्था, मिरज यांच्या शुभहस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड व निसर्गाशी सुसंवाद राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. शिकंदर जमादार, माजी चेअरमन – जिल्हा मध्यवर्ती बँक लि., सांगली यांनी “मी एनएसएसमधून कसा घडलो” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.एनएसएसच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्वगुण, सेवाभाव व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रमाचा संस्कार आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करत, कष्टाची सवय ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. यावेळी एनएसएस गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, श्रमदान, आरोग्य व सामाजिक जनजागृती, व्यक्तिमत्त्व विकास यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व जबाबदारीची जाणीव निर्माण होणार आहे. या उद्घाटन समारंभास सरपंच श्री. रियाज तांबोळी, उपसरपंच श्री. विनोद जगदाळे, ग्रामपंचायतच्या माजी सदस्या श्रीमती मंगल भोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. त्यांनी शिबिरामागील उद्दिष्टे, सात दिवस राबविण्यात येणारे उपक्रम, तसेच ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शंकर पाकले यांनी मानले. तसेच महाविद्यालयातील प्रा. ए. एल. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश गावित, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. वंदना सातपुते, डॉ. विश्वंभर शिंदे, प्रा. हर्षल वांगीकर, प्रा. नलेश बहीरम, प्रा. के. के. चौगुले यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment