yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी





सांगली : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा. रोहिणी वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांचे बालपण अत्यंत साध्या आणि संघर्षमय परिस्थितीत गेले. लहानपणीच त्यांनी कठोर परिश्रम, शिक्षणाची जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्या आईकडून घेतली. अडचणींच्या परिस्थितीतही शिक्षण आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी मोठे स्वप्न पाहिले आणि ते साकारही केले. त्यामुळेच सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी महाराष्ट्राच्या घडणीत मोलाची भूमिका बजावली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले नेतृत्व, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे महान नेते होते. त्यांनी शिक्षण, सहकार आणि समाजकारण या क्षेत्रांत दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प करावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसाय शिक्षण विभागातील प्राध्यापक, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)