डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राखी निर्मिती प्रदर्शन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राखी निर्मिती प्रदर्शन
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी निर्मिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध प्रकारच्या आकर्षक व कल्पक राख्या तयार केल्या.
प्रदर्शनात पर्यावरणपूरक राखी, टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या, देशभक्ती व सैनिकांना समर्पित राख्या, सायबर सुरक्षा राखी, महाराष्ट्राची संस्कृती व लोककला दर्शविणाऱ्या राख्या तसेच प्लास्टिकमुक्त राख्या मांडण्यात आल्या. विविध नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य वस्तूंचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्यांनी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण वाढविले.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले तसेच कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर, व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख डॉ. ए. एस. सपकाळ, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. डी. पाकले यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा स्नेहपूर्ण संदेश दिला. याप्रसंगी कु. मधुरा कांबळे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य डॉ. कणसे यांनी मनोगतात रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वास दृढ करणारा सण आहे. भारतीय संस्कृती व परंपरेमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. बदलत्या काळातही आपल्या संस्कृतीतील चांगल्या परंपरा जपून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांमधून पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होत आहे.”
राखी निर्मिती प्रदर्शनात इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनी कु. स्नेहा राजेंद्र जाधव हिने प्रथम क्रमांक, कु. सविता हनमंत मोरे हिने द्वितीय क्रमांक, तर इयत्ता ११ वीच्या कु. प्रियांका संतोष सावंत हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता ११ वीच्या कु. रश्मी पांडुरंग मोहिते हिला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून प्रा. सतीश कांबळे, प्रा. सौ. सुजाता लंकेश्वर व प्रा. प्राची पाटील यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. डी. पाकले यांनी केले, तर आभार प्रा. आर. एस. काटकर यांनी मानले. प्रा. सौ. वासंती गावडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)





Post a Comment