सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विभागात एम.एस्सी. भाग १ च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन एम.एस्सी. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग हा सांगली जिल्ह्यातील अग्रगण्य विभाग असून महाविद्यालयातील प्रयोगशाळा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून संशोधन क्षेत्रात अग्रेसर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयात एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र, एम.एस्सी. अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि एम.कॉम. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र या विभागांमध्ये पीएच.डी. संशोधनाची सुविधाही उपलब्ध असल्याचे डॉ. कणसे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारती विद्यापीठाच्या स्थापनेपासून झालेल्या विस्ताराचा तसेच महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख डॉ. ए. आर. सुपले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एम.एस्सी. भाग १ मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख कु. बी. के. भावीकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील उल्लेखनीय कामगिरी तसेच विभागातील सुरू असलेल्या संशोधनाची माहिती त्यांनी दिली. उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर कु. वैष्णवी पाटील व श्री. अरिफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. व्ही. माळी यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील आधुनिकीकरण, रोजगाराच्या संधी आणि विभागातील संशोधनकार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती वाढविण्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस्सी. भाग २ मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटील व कु. तनुजा वरपे यांनी केले, तर श्री. प्रज्वल कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यानंतर एम.एस्सी. भाग २ च्या विद्यार्थ्यांतर्फे नवागत विद्यार्थ्यांसाठी अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध फनी गेम्स, कलागुणदर्शन व कविता सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. एम.एस्सी. भाग १ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात कु. बी. के. भावीकट्टी व प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांच्या हस्ते एम.एस्सी. भाग १ मधून मिस्टर फ्रेशर म्हणून श्री. मोहम्मदफैज पेंढारी आणि मिस फ्रेशर म्हणून कु. निहारिका मोटे यांची निवड करण्यात आली. दोघांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अरिफ मुलाणी, कु. वैष्णवी पाटील, सपना वेल्हाळ, प्रिया पवार व गायत्री चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)







Post a Comment