डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात टीसीएसचा कँपस ड्राइव्ह : १९ विद्यार्थ्यांची निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात टीसीएसचा कँपस ड्राइव्ह : १९ विद्यार्थ्यांची निवड
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या वतीने टीसीएस बीपीएस ऑफ-कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला.
सांगली शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या भरती अभियानाला विद्यार्थ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निवड प्रक्रियेत १९ विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये निवड झाली.
महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य ‘गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन’ या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण
शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयात विविध
उपक्रम सातत्याने राबविले जातात. याच उद्देशाने महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता
हमी कक्ष आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅम्पस
ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना
नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना
उद्योगविश्वाच्या गरजांनुसार तयार करणे, यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम
राबविले जात आहेत. या कार्यक्रमासाठी टीसीएसचे प्रतिनिधी श्री. उबैद सय्यद, असिस्टंट मॅनेजर, टीसीएस हे उपस्थित होते. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेचे विविध टप्पे पार पडले.
विशेष म्हणजे, सांगली शहरात प्रथमच टीसीएसचा ऑफ-कॅम्पस ड्राइव्ह डॉ.
पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम सांगली शहर व परिसरातील
विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला.
भरती प्रक्रियेदरम्यान सहभागी उमेदवारांची विविध
टप्प्यांतून निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि
आत्मविश्वासाने या प्रक्रियेत सहभाग घेतला. अंतिम निकालात १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून टीसीएसमध्ये रोजगाराची
संधी मिळविली. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे
वातावरण निर्माण झाले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी निवड झालेल्या सर्व
विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला चालना मिळत असल्याचे सांगितले.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. टी. आर. लोहार यांनी टीसीएसच्या संपूर्ण भरती टीमचे
विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC)
आणि प्रशिक्षण व
प्लेसमेंट कक्ष, प्राध्यापकवृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या
सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती रोहिणी वाघमारे यांनी केले.
या कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये
करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळाली असून, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना आणखी एक
उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)






Post a Comment