Header Ads

Loknyay Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आत्मसात करा : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आत्मसात करा : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे


सांगली :  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याबद्दलचे प्रेम, निष्ठा, त्यांनी केलेल्या पराक्रमाच्या पाऊलखुणा इतिहासात आजही अजरामर आहेत. त्यांनी घडविलेला वैभवशाली इतिहास केवळ वाचून चालणार नाही तर तो प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते.  जातीधर्माच्या पलीकडे जाऊन एक आदर्श शासनकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. स्त्रियांचा सन्मान आणि शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणे ही प्रजादक्ष राजा म्हणून त्यांची ओळख आजही जनमानसात आहे. महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून  आणि त्यागवृत्तीतून आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे विचार आणि आचार प्रत्येकाच्या मनात रूजले पाहिजेत, म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देश, विदेशातही त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.'



छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या प्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'गर्भजलाची नको चाचणी' या विषयावर पथनाट्य सादर केले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. तानाजी सावंत, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)