Header Ads

Loknyay Marathi

कुटुंबवत्सल सेवाव्रती : विजयमाला कदम वहिनीसाहेब

कुटुंबवत्सल सेवाव्रती : विजयमाला कदम वहिनीसाहेब

प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे
भारती विद्यापीठाचे
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व सहकार क्षेत्रात स्वकर्तुत्वाने आपल्या कार्याची मोहोर उमटविणाऱ्या भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा व कुटुंबवत्सल सेवाव्रती विजयमाला कदम वहिनीसाहेब यांना नुकताच विश्वरत्न ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ महामाता रमामाई भीमराव आंबेडकर  राष्ट्रीय  स्मारक पुणे यांच्या वतीने  "रमाई  रत्न  पुरस्कार-२०२२" देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल  भारती विद्यापीठाच्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर विभागाच्यावतीने सांगली मध्ये शुक्रवार दिनांक २२एप्रिल  रोजी गुणगौरव व सन्मान पत्र सोहळा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याचे औचित्य साधून वहिनीसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव  करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
 
सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक विश्‍वात मानाचा शिरपेच धारण करणाऱ्या महामाता रमामाई भीमराव आंबेडकर  राष्ट्रीय  स्मारकाच्या वतीने आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, भारतीय संविधानाची प्रत, तिरंगी शाल व बोधिवृक्ष देऊन वहिनीसाहेबांना गौरविण्यात आले. ही भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
      
माणूस ही जात व माणुसकी हा धर्म मानून आयुष्यभर निस्वार्थीपणे लोककल्याणाचे कार्य करणारे भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या शाश्वत व अलौकिक कार्यात वहिनीसाहेबाचे योगदान व त्याग अतुलनीय आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत वहिनीसाहेबांनी भारती विद्यापीठाच्या कामकाजात स्वतःला वाहून घेतले आहे. भारती विद्यापीठ  शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून वहिनीसाहेबांनी भारती विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रगतीमध्ये  सक्रिय सहभाग घेऊन समर्थपणे शैक्षणिक जबाबदारी सांभाळली आहे. 

वहिनीसाहेबांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. त्यांनी त्यांच्या सासुबाई मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम यांच्या स्मरणार्थ न्यासाची स्थापना केली आहे. शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या महिला खडतर प्रवास करत आपल्या मुलांना यशाच्या शिखरापर्यंत नेतात व त्यांच्यामध्ये समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य निर्माण करतात अशा महिलांना न्यासाच्या वतीने प्रतिवषी आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्त्री प्रत्येक कुटुंबाची शक्‍ती असते ती स्वावलंबी झाली पाहिजे, तिने स्वतः उद्योजक बनावे यासाठी बचत गटांच्या महिलांसाठी नेहमी वेगवेगळी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येते. बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूनां हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतुने वहिनीसाहेबांनी कृष्णाई महोत्सव आयोजित केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी ती चं व्यासपीठची निर्मिती केली आहे. तसेच मुलींचे कमी होणारे प्रमाण उद्यासाठी धोक्याचे आहे. त्यासाठी त्यांनी मुलगी हवी हो यासारखे उपक्रम सक्षमपणे राबविले आहेत.

एक शिस्तप्रिय, कडक व संस्कारक्षम आई अशी त्यांची प्रतिमा आहे. कारण राज्याचा कारभार व भारती विद्यापीठाचा व्याप यामुळे साहेब जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असायचे अशा परिस्थितीमध्ये मुलांवर उत्तम संस्कार करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. यामुळेच भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम व भारती हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता ताई घडल्या आहेत.

आपल्या मुलांची योग्य जडण-घडण करुन त्यांना उत्तम नागरिक बनविणाऱ्या वहिनीसाहेबांनी समाजातील दीन-दुबळयांचे भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मातृत्व स्वीकारले व त्यांच्या उत्कर्षासाठी त्या अहोरात्र झटत आहेत. त्यामुळेच जिजामाता पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या व त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून प्रेमलाकाकी चव्हाण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

वहिनीसाहेबांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच संवेदनक्षमता प्रत्यय येतो. सर्वसामान्यांबद्दल असणारी प्रचंड आपुलकी त्यामधून जाणवते. भारती विद्यापीठात मला १९९० पासून त्यांच्या सहवासात व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी भारती विद्यापीठाच्या एरंडवणा येथील मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो. त्यावेळी येणाऱ्या अडचणी त्या तात्काळ सोडवत. वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येकाची सोय कशापध्दतीने होते आहे यावर त्यांचे नेहमी लक्ष्य असते. कडेगांव येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करीत असताना वेगवेगळ्या नाविण्यपुर्ण उपक्रमांच्या माध्यमातून वहिनीसाहेबांचा विद्यार्थिनीशी संवाद घडत असे.

ग्रामीण भागातील विद्या्थीनींचा सर्वागीण विकास करणेसाठी त्यांचा कटाक्ष असायचा, यातून आपल्या मुलीप्रमाणे विद्यार्थिनींच्यावर संस्काररुपी मार्गदर्शन करणाऱ्या वहिनीसाहेबांचे कुटुंबवत्सल प्रेम, आत्मीयता नेहमी पहावयास मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्रातील आदर्श महावियालय म्हणून या महाविद्यालयाकडे पाहिले जाते. २०१२ साली झालेल्या नॅक च्या तपासनीत महाविद्यालयास 'अ' दर्जा मिळाल्याबद्दल त्यावेळी त्यांनी महाविद्यालयात येऊन सर्वाचे अभिनंदन केले होते.

सध्या मी कार्यरत असलेल्या सांगलीतील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळत असताना महाविद्यालयातील विविध उपक्रमांना वहिनीसाहेबांचे अनमोल मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. महाविद्यालयातील विद्यार्थ्याना साहित्याची आवड निर्माण व्हावी याकरीता ज्ञानभारती साहित्य संमेलनाचे संयोजन वहिनीसाहेबांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी वहिनीसाहेबांनी विद्यार्थ्याना केलेल्या प्रेरणादायी मनोगतात मानवी जिवन समृध्द होणे व ज्ञानाने सक्षम होणेसाठी वाचन संस्कृती रुजवली पाहिजे यासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयाचा संर्वानी उपयोग करावा असे सांगताना त्यांच्यामधील साहित्यिक सर्वाना पहावयास मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध चर्चासत्रे, शिबीरे, कार्यशाळा आदी उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील उपक्रमशील महाविद्यालय असा लौकीक या महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. या सर्वांमध्ये वहिनीसाहेबांचे मार्गदर्शन फार मोलाचे आहे. सर्व परिस्थिती वर त्यांचे अचूकपणे लक्ष्य असते. काही गोष्टी चुकत असल्यास त्याचक्षणी त्या निदर्शनास आणतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची समाजाला गरज असुन त्यांच्या हातुन समाजाला दिशादर्शक असे अजुन खूप काम होणार आहे. यात शंकाच नाही. त्यासाठी त्यांना दीर्घायू लाभो, त्यांचे आरोग्य उत्तम राहो. 
आदरणीय वहिनीसाहेब

 आपली गरूड भरारी अशीच जावो गगनावरी, 
 कर्तुत्व बहरो या भूवरी हीच सदिच्छा सदैव अतंरी!