ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज: डॉ. नामदेव कस्तुरे
ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज: डॉ. नामदेव कस्तुरे
सांगली: एकविसाव्या शतकात विज्ञानाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालताना दिसून येते. त्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सांगलीतील युवा संस्कार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नामदेव कस्तुरे यांनी केले. येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात जनजागृती करायची असेल तर अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच श्रमप्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व विकास, स्वावलंबन, राष्ट्रप्रेम यांसारखी जीवनमूल्ये रूजली जातात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे शिबिर आवश्यक आहे. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची आणि समाजसेवा करण्याची वृत्ती विकसित होते. ज्यावेळी सांगली शहर आणि परिसरात महापूर आला होता त्यावेळी महाविद्यालयातील हेच स्वयंसेवक मदतीला धावून आले होते. या प्रसंगाची आठवण त्यांनी करून दिली.
याप्रसंगी मौजे डिग्रज गावच्या सरपंच सौ. गीतांजली इरकर, उपसरपंच श्री. प्रमोद लांडे, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. रवींद्र कांबळे, श्री. बाळासो पाटील, श्री. शिवाजी जाधव, श्री. आदिनाथ चौगुले, श्री. सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभा पाटील, कला वा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास आवळे, प्रा. रुपाली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य डॉ. ए. एम सरगर, प्रा. वाय. सी. धुळगंड, प्रा. डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. व्ही. ए. सातपुते, तसेच ग्रामस्थ, माविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रुपाली कांबळे व आभार डॉ. व्ही. ए. सातपुते यांनी मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment