Header Ads

Loknyay Marathi

सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी जाणून घ्या...!

सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jotiba Phule)


सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आज त्यांची १९३ वी जयंती आहे.

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत.

जन्म:

महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता. ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई चिमणाबाईंचे अकाली निधन झाले. बाळ जोतिबा आईविना पोरके झाले. आपल्या त्यागी पत्नीच्या निधनाने गोविंदरावाना अतिशय दुःख झाले. काय करू आणि काय नको अशी त्यांची मनःस्थिती झाली. काहींनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला पण गोविंदरावांनी तो ऐकला नाही. ज्या काळात एक पत्नी जिवंत असतानाही दोन-तीन-चार विवाह करण्याची पद्धत होती अशा काळातही गोविंदरावांनी दुसरे लग्न केले नाही यावरून त्यांचे चिमणाबाईवर असलेल्या प्रेमाची आपणास जाणीव होते.

सातव्यावर्षी शाळेत दाखल
भारतात शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज राजवटीमुळे तो अधिकार मिळायला सुरुवात झाली. पुण्यात पहिली मराठी शाळा सन १८२४ मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती. या शाळेत गोविंदरावांनी जोतिबांना वयाच्या ७ व्या वर्षी दाखल केले. जोतिबा हे पहिल्यापासुनच कुशाग्र बुद्धीमत्तेचे, कष्टाळू, प्रतिभासंपन्न असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरूवात केली. तोंडी गणिते सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागले त्यांची अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहुन मात्र काहींचा जळफळाट झाला नसेल तर नवलच.

पाटी दफ्तर जाऊन हाती कुदळ खुरपे आले:
इंग्रज सरकारने ठिकठिकाणी शाळा उघडल्या बरोबर प्रस्थापित वर्गातील लोकांनी धर्म बुडाला | कलियुग आले || विद्या नीच घरी गेली || म्हणून चोहीकडे हलकल्लोळ उडविला. ‘तुम्ही शूद्रांनी विद्या शिकल्याने सारा भ्रष्टाचार होऊन धर्म बुडेल’ असाही लोकांना उपदेश करू लागले. धार्मिक धाक दडपशाही भिऊन लोक ऐकणार नाहीत म्हणून ‘तुमच्या मुलांना शाळेत बसवून तुमचे उद्योगधंदे बुडवावे; असा इंग्रज सरकारचा डाव आहे. तुम्ही आपले उद्योगधंदे सोडून मुलांना शाळेत घालू नका’ असेही हे धर्मगुरू लोकांना सांगत सुटले आणि त्याच प्रमाणे गोविंदरावांच्या कारकुनाने व ईतर लोकांनी गोविंदरावांच्या डोक्यात भलतेच वेड भरून दिले. त्यांना सांगितले होते, की या मुलाला शाळेत घालून ऐदी बनविण्यापेक्षा बागेत काम करायला शिकवा. म्हणजे हा तुमचे कुटुंबाचे पुढे उत्तम पोषण करील अशी समजुत सरळ, भोळ्या मनाच्या गोविंदरावांची काढण्यात आली. त्यामुळे जोतिरावांच्या हातचे पाटी दफ्तर व दौत लेखणी जाऊन त्या ऐवजी हाती कुदळ खुरपे आले.

विवाह:
जोतिबा आता मळ्यात टिकाव, फावडे, विळा, नांगर, खुरपे यांच्या सोबतीत दिवस घालवत होते. जोतिबा आपल्या वडीलांच्या सर्व गोष्टी ऐकत व त्या पुर्ण करत. जोतिबा तेरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह सगुनाबाईंच्या पसंतीनुसार सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची चतुररत्र नऊ वर्षाची कन्या ‘सावित्री’शी सन १८४० मध्ये मोठ्या थाटामाटात झाला. पुढे शेतीच्या कामाच्या दिवसात जोतीराव आणि गोविंदराव पहाटे उठून मळ्यात जात फुलझाडांची काळजी घेत. सावित्रीबाई घरातील सर्व कामे आवरून जेवण घेवून मळ्यात जात असे. शेतात सकाळच्या वेळी कामे उरकून जेवण झाले की सर्व मंडळी आंब्याच्या झाडाखाली (जोतीराव, सावित्रीबाई आणि सगुनाबाईं) स्वतःची शाळा सुरू करत. जमिनीची पाटी व काकडीची पेन्सिल करून अक्षर गिरवत बसत.

१८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू:

दोन तीन वर्षांच्या अंतरानंतर गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन मिशनरी लिजीटसाहेब यांच्या मदतीने जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. शाळेत शिकवलेले घटक घरी आल्यावर जोतीराव सावित्रीबाईंना व सगुनाबाईंना सांगुन त्यांना शिकवू लागले. अशातच त्यांच्या हाती थोर लेखक थाॅमस पेन यांचा ‘द राईट आॅफ मॅन’ हा ग्रंथ वाचनात आला. या ग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. निग्रो लोकांवर लादलेली गुलामी आणि त्यामुळे त्यांचे होत असलेले हाल जोतिबांच्या मनाला दुःख देऊन गेले. मानवी स्वातंत्र्याचा आणि समतेचा ध्येयवाद त्यांच्या मनात आकार घेऊ लागला. आपल्या देशातही ही स्थिती कमी-अधिक प्रमाणात असल्याचे त्यांना जाणवत होते. ज्याप्रमाणे निग्रो लोकांना वागवले जाते, त्यांचे हक्क अधिकार नाकारले जातात त्याप्रमाणे भारतातही अस्पृश्य समजलेल्या समाजाचीही तीच अवस्था आहे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये जोर धरू लागली. खरा धर्म म्हणजे काय? या विषयी ते चिंतन करू लागले सदाचार, नैतिकता हेच खरया धर्माचे सार आहे, याची जाणीव झाली. ही जाणीव आपल्या देश बांधवांमध्ये होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आपल्या बांधवांचे अज्ञान दूर करून त्यांना माणुस बनवण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी जागृत करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी स्त्रीया व शुद्र यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला. स्त्रीयांना आपल्या कर्तव्याची योग्य रीतीने जाणीव झाली तर राष्ट्राची प्रगती झपाट्याने होईल याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी १ जानेवारी १८४८ साली पुण्यातील बुधवार पेठेत तात्याराव भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून वर्षानुवर्षे पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधाराच्या विळख्याला मोठा छेद दिला.ही घटना म्हणजे भारताच्या शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक इतिहासातील मोठी क्रांती होय.

पहिला पुनर्विवाह लावला:
सन १८४८ ते १८५२ पर्यंत पुण्यात सर्व जाती धर्माच्या पोरा-पोरींना,स्त्री-पुरूषांना शिकता यावं म्हणून जवळपास १८ शाळा आणि १ प्रौढ शाळा सुरू केली. या शाळेत जोतिबा, सावित्रीबाई स्वतः अध्यापन करू लागले. शूद्रातिशूद्र मुला मुलींना ज्ञानाचे दरवाजे उघडे करणारे महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक काळातील थोर भारतीय महापुरूष आहेत. त्या काळात बालविवाह व्हायचे तरूण वयात विधवा झालेल्या स्त्रीयांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता विधवांची दैन्यावस्था पाहुन जोतीरावांचे मन गहिवरून आले. अन्यायाविरूद्ध बंड करणे हा त्यांचा बाणा होता. त्यांनी विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह घडवून आणायचे ठरविले. हिंदु स्त्रीला तिच्या जुनाट बंधनातुन मुक्त करण्यासाठी ५ मार्च १८६४ रोजी पुण्यातील गोखले यांच्या वाड्यात रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघांचा पहिला पुनर्विवाह स्वहस्ते लावला. जोतीराव हे बोलणारे समाज सुधारक नव्हते तर प्रत्यक्ष कृती करणारे समाज सुधारक होते. कोणत्याही कर्मकांडाला थारा नसलेला आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाना नाकारून प्रत्येक मानवाला अधिकार देणारा,स्त्री-पुरूष यात भेद न करणारा संपूर्ण समतावादी अशा ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना २३ सप्टेंबर १८७३ करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढण्याचे काम केले.

छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा जीर्णोध्दार:
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेवून जीर्णोध्दार केला. छत्रपतींच्या कार्यावर सोप्या भाषेत आठ पोवाडे लिहुन छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास लोकांनपर्यंत पोहचवला. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, ब्राम्हणांचे कसब या ग्रंथातुन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरीवर प्रहार करून समस्त मानव जातीला मुक्त करण्याचं महान कार्य केलं आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीचे जनक असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांना अजुनही भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही याची मनाला खंत वाटते. भारत सरकारने अशा या थोर समाज सुधारक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवून त्यांच्या कार्यांचा गौरव करावा. ही समस्त भारतीयांची ईच्छा आहे.

महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस त्रिवार विनम्र अभिवादन !