विद्यापीठ परीक्षांसंदर्भात अद्याप निर्णय नाही- उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत
ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही
राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
श्री.सामंत यांनी आज सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला.
श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे, आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.
कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा
कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा सर्व विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती करण्यात येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. हा अभ्यासक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 साठी देवून सहकार्य करावे असे, आवाहन श्री. सामंत यांनी केले.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांनी सहभाग घेतला.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment