ध्येयावर सूर्यफुलासारखे लक्ष केंद्रित करा - सिरम मॅनेजर मा. कीर्तीकुमार सातपुते
ध्येयावर सूर्यफुलासारखे लक्ष केंद्रित करा - सिरम मॅनेजर मा. कीर्तीकुमार सातपुते
जागतिक क्षेत्रात लस व औषध निर्मितीमध्ये भारताचा दबादबा निर्माण झाला असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे जनरल मॅनेजर श्री. किर्तीकुमार सातपुते यांनी केले.
ते भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. 'फार्मा इंडस्ट्रीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा' या विषयावर बोलत असताना पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली ऊर्जा योग्य कामासाठी वापरावी, नवीन कौशल्ये आत्मसात करावीत आणि प्रत्येक काम आज पेक्षा उद्या जास्त चांगले कसे होईल यासाठी प्रयत्नशील राहावे. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सातपुते यांनी विद्यार्थ्यांनी रिझ्युम कसा लिहावा, मुलाखतीला जाताना कसे जावे, पेहराव, देहबोली कशी असावी, मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी आणि यश मिळवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल कसे घडवून आणावेत याविषयी सोदाहरण सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेकानंद रणखांबे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाची माहिती सांगून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व भारती विद्यापीठ यांचे कसे जुने नाते आहे आणि अशा तज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून येऊ शकतो, विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते असे प्रतिपादन केले.
सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रा. सपना वेल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. वैष्णवी पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. डॉ. आनंदा सपकाळ, प्रा. समृद्धी पाटील, प्रा. प्रिया पवार यांच्यासह इतर अनेक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment