Header Ads

Loknyay Marathi

ऑनलाईन बाजारपेठेत ग्राहक हक्कांची जाणीव असणे गरजेचे : जनार्दन झेंडे

 ऑनलाईन बाजारपेठेत ग्राहक हक्कांची जाणीव असणे गरजेचे :  जनार्दन झेंडे 

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त व्याख्यान     

       सांगली : आजच्या डिजिटल युगातील स्पर्धात्मक  बाजारपेठेमध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सांगली ग्राहक पंचायतीचे सहसंघटक जनार्दन झेंडे यांनी व्यक्त केले. 

येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त वाणिज्य मंडळामार्फत आयोजित केलेल्या व्याख्यानात  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत  होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे होते. यावेळी व्यासपीठावर कला व वाणिज्य प्रमुख प्रा. तानाजी सावंत तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. (डॉ) शिवाजी बोऱ्हाडे  हे उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे  बोलताना झेंडे म्हणाले की, ग्राहकांचे त्यांच्या हक्कांबाबत असणारे अज्ञान हेच त्यांच्या फसवणुकीचे मूळ कारण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक व पिळवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या हक्कांचा अभ्यासपूर्वक वापर करावा.  ग्राहक म्हणून बाजारपेठेत स्वतः फसूही नये आणि कुणाला फसवूही नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, ग्राहकांनी बाजारपेठेमध्ये त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जागरूकपणे खरेदी करणे गरजेचे आहे. फसव्या जाहिरातींना नाहक बळी पडू नये. ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी ग्राहकांच्या हातामध्ये असणारे एक मोठे शस्त्र असून त्याचा त्यांनी सुयोग्य वापर करावा. मात्र त्यासाठी ग्राहकांनाही आपल्या हक्कांची नेमकी जाण असायला हवी.

        यावेळी प्रा. अमोल कुंभार, प्रा. सतिश कांबळे, श्री. दत्ता मोहिते तसेच महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. (डॉ) शिवाजी बोऱ्हाडे यांनी केले. प्रा. बाबासाहेब कुराडे यांनी आभार मानले. तर प्रा. डॉ. अनिकेत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)