Header Ads

Loknyay Marathi

वाचानानेच आत्मबळ मिळते : प्रा. प्रदीप पाटील

वाचानानेच आत्मबळ मिळते : प्रा. प्रदीप पाटील
सांगली: स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी व समाजात आपले स्थान निर्माण होण्यासाठी आपण आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून स्वत:ला एक आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचनानेच आत्मबळ व एक प्रकारची प्रेरणा मिळते असे ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रतिपादन केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी प्रा. प्रदीप पाटील यांनी आपल्या मनोगतात, सध्या इंटरनेटवर भरपूर माहिती मिळते, त्यामुळे वाचकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. पण ही माहिती कितपत सत्य असते हेही पहिले पाहिजे, व त्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. माणूस भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत असताना वाचनापासून दूर होत आहे अशी खंत व्यक्त केली. 
एकाच क्षेत्रातील वाचन करण्यापेक्षा सर्व क्षेत्रातील वाचन करावे, अनेक मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचा, लोककथा वाचा, लोकसाहित्य वाचा असे आवाहन प्रा. पाटील यांनी यावेळी केले. वाचनामुळेच आपली संस्कृती समजते. समाजातील वाईट रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी समाजात वाचानानेच बदल घडत आलेले आहेत.  वाचनाने ज्ञानवृद्धी होते. जगण्याची दृष्टी मिळते. एक नवी उमेद निर्माण होते. सामर्थ्य कळते. तसेच तणावातून मुक्ती मिळण्यासाठी वाचन गरजेचे असते. वाचनातूनच जगणे सुखकारक होते. 
     
आपण चांगले वाचले तर आपण चांगला समाज घडवू शकतो. वाचन वृद्धी व संस्कृतीचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजाचा विकास, ज्ञानसंपन्न समाज निर्मिती, व्यक्तिमत्व विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास त्याचबरोबर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी वाचन करण्याची गरज आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
     
कार्यक्रमास महाविद्यालयातील सायन्स विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, तसेच कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी.आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डॉ. ए.आर. सुपले त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कोविड-१९ चे सर्व नियम पाळून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी केले. आभार डॉ. ए. एम. सरगर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सौ. शिल्पा साळुंखे यांनी केले.