Header Ads

Loknyay Marathi

तरुणाईने पर्यटनाकडे व्यवसायाची संधी म्हणून बघावे - डॉ.शार्दूली तेरवाडकर

तरुणाईने पर्यटनाकडे व्यवसायाची संधी म्हणून बघावे - डॉ.शार्दूली तेरवाडकर

पर्यटन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून अलीकडच्या काळात भ्रमंतीसाठी जगभर फिरणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. भारतातील तरुणाईने पर्यटनाच्या क्षेत्राकडे एक फार मोठी संधी म्हणून बघावे असे मत प्रसिद्ध प्रवास वर्णन लेखिका डॉ. शार्दूली तेरवाडकर यांनी व्यक्त केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ट्रॅव्हल अँड टुरिजम विभागाच्या वतीने 'प्रवास प्रदर्शन व भारतातील पर्यटन संसाधने' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रवास वर्णन लेखिका डॉ. शार्दूली तेरवाडकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. शार्दूली तेरवाडकर म्हणाल्या की, पर्यटनाची सवय लहानपणापासून विकसित करावी लागते. पर्यटनाच्या माध्यमातून माणसाला जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करता येते. महाविद्यालयीन स्तरावर पर्यटन अभ्यासक्रम राबविणे काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केल्यास खऱ्या अर्थाने सर्वांगीण होईल. अलीकडच्या काळात जगभर  जे बदल होत आहेत, त्यादृष्टीने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

पार्थ हॉलिडेज सांगलीचे संचालक मा. मुकुंद माने यांचे 'पर्यटन आणि पर्यटनाच्या संधी’ या विषयावर  मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. मार्गदर्शनपर भाषणात मा. मुकुंद माने म्हणाले, पर्यटन करीत असताना पर्यटनाचे नियम पाळले पाहिजेत विशेषतः विदेशात प्रवास करताना परदेशातील नियम पाळले नाहीत तर अनेक अडचणी येतात.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अमित सुपले त्याबरोबरच महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, विविध विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांचे आभार  प्रा. नवनाथ लवटे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. पी. एन. शेळके यांनी केले.
(Bhatati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)