Header Ads

Loknyay Marathi

मानवतेचा महामेरु: डॉ. पतंगराव कदम ( साहेब )

प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे / सांगली  - ८ / १ / २०२० 


“जेंव्हा पर्वतासारखी उत्तुंग माणसे पर्वतांना भेटतात आणि पर्वतासारखी उत्तुंग आव्हाने सामर्थ्यशाली हातांनी पेलतात तेंव्हाच उत्तुंग कार्याचे महामेरु उभे राहतात.” 

याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेब. तारुण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्‍वास आहे, गौरव आणि सर्व काही आहे. तारुण्य व्यक्तिच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. या जगप्रसिध्द मुन्शी प्रेमचंद यांच्या विचाराची सत्यता डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या अलौकिक कर्तृत्वाकडे पाहिले की होते. तारुण्यवस्थेतील  महत्वाचा काळ शक्‍ती, कार्यक्षमता, बुध्दिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश व पर्यायाने मानवसमाज प्रगतिपथावर जाऊ शकतो याची जाणीव ठेवून डॉ. पतंगराव कदम साहेबांनी स्वतःवर विश्‍वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाजजीवन उजळवून टाकण्यासाठी वयाच्या १९ व्या वर्षी पुण्यात १० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली.

साहेबांचे कार्य म्हणजे प्रगतशिल भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक इतिहासातील एक सोनेरी पान आहे. पराकोटीची गरीबी आणि श्रीमंती त्यांनी अलुभवली. हजारो कुटुंबाचे अन्नदाते झाले. त्यांच्या कर्तृत्वसंपन्न वाटचालीविषयी संपूर्ण  महाराष्ट्राला  अभिमान वाटत आला आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र, पर्यावरण, सहकार अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांचे कैवारी, लोकनेता, कर्मयोगी, भाग्यविधाते, जाणता राजा, आधारवड, जननेता, महानायक, रयतेचा राजा, दिलखुलास व्यक्‍तीमत्व आदी विविध उपाध्यांनी त्यांना गौरविण्यात आले.

जर माणूस त्याच्या जीवनात येणाऱ्या संधीवर आरुढ झाला तर तो संधीचं सोन करु शकतो. मात्र त्यासाठी त्याला संधीचा स्वीकार आव्हान म्हणून करावा लागतो. मा. साहेबांनी नेमकं हेच केलं. त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीला ते सामोरे गेले. संधीला संकट न मानता आव्हान म्हणून स्वीकारले. त्यातूनच त्यांचे अष्टपैलू कर्तृत्व विकसित झाले. अथात हे सर्व करत असताना त्यांना अनेक संकटांना तोंड दयावे लागले आहे. गरीबी, दारिद्रय व प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागला आहे. अग्नितून तावूनसुलाखून निघाल्यानंतर सोन्याचा जसा कस लागतो तसाच कस त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेर्तृत्वाचा लागला आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्‍तीचे ठरणार नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक संकटांना तोंड देवून व हालअपेष्टा सहन करुन त्यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वाटचालीचे पर्व सुरु झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सोनसळसारख्या छोट्या गावात दि. ८ जानेवारी १९४४ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या मा. साहेबांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून बहुजन समाजातील सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याचा, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सर्वांंगीण विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, याची प्रचिती भारती विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये शिकत असणारे अठरा पगड जातीचे विद्यार्थी त्यांंना शिकविणारे सेवक यांचा आढावा घेतल्यानंतर येते. आज घडीला भारती विद्यापीठाच्या छत्रछायेमध्ये जशी श्रीमंतांची मुले शिकतात तशी गरीबांची मुलेदेखील मा. साहेबांनी दिलेल्या विविध प्रकारच्या सवलतीच्या माध्यमातून श्रीमतांच्या मुलाच्या तोडीस तोड शिक्षण घेत आहेत. एवढेच नव्हे तर भारती विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन भारती विद्यापीठाच्याच विविध शाखांमध्ये उच्च पदावर नोकऱ्यादेखील करु लागले आहेत.

सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या या व्यक्‍तिमत्वाने भारती विद्यापीठाबरोबरच सहकारी संस्थांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कायापालट केला आहे. आधुनिक भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वैचारिक जागृती आणि परिवर्तन घडवून आणण्याच्या उदे्‌शाने त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. 'गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन" या संस्थेच्या ब्रीदवाक्याला साजेल असे समाजपरिवर्तनाचे कार्य केले आहे. 'मानव ही जात आणि मानवता हा धर्म' मानणाऱ्या साहेबांनी अनेक गरजू व्यक्तिंना, अनाथ विद्यार्थ्यांना कोटयावधी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. हजारो विद्यार्थ्यांंची कोटयवधी रुपयांची फी माफ केली आहे. लाखो विद्यार्थ्यांंच्या भोजनाची व निवासाची मोफत सोय केली आहे. त्यामुळेच कित्येक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण पूर्ण होऊ शकले. आपणास सहजासहजी शिकता आले नाही पण ज्यांना- ज्यांना शिकता येईल त्यांना- त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले आहे. गरीबांबद्दलची तळमळ असणारा आणि आर्थिक साह्यातून शैक्षणिक दर्जा वाढविणारा असा नेता विरळाच.

सध्या भारती विद्यापीठाच्या तब्बल १८० हून अधिक शाखामधून सहा लाख विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. तसेच दहा हजाराहून अधिक सेवक भारती विद्यापीठाच्या सेवेत सामावले आहेत. असा प्रचंड पसारा आणि विस्तार असलेल्या भारती विद्यापीठामध्ये मेडिकल, डेंटल, आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, नर्सिंंग, फार्मसी, इंजिनिअरींग, लॉ., आर्टस्‌, कॉमर्स व सायन्स, मॅनेजमेंट इ. विद्याशाखांचे शिक्षण दिले जाते. अद्ययावत सोयी-सुविधांनी, सुसज्ज इमारतीमधून काळानुरुप शिक्षण दिले जात आहे. संस्था स्थापन करताना मा. साहेबांनी पाहिलेले विद्यापीठाचे स्वप्न २६ एप्रिल १९९६ साली पूर्ण झाले आणि भारती विद्यापीठास यु.जी.सी. ने विश्‍वविद्यालयाचा दर्जा दिला. एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणजेच मा. साहेब हे मल्टीस्टेट, मल्टीफॅकल्टी विद्यापीठाचे कुलपती झाले. मातृभाषा असलेल्या मराठीवरचे आक्रमण वाढत असल्याची चिंता हल्ली व्यक्‍त केली जात असताना मा. साहेबांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मायमराठीच्या रक्षणासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने अमेरिकेत राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी शाळा सुरु केली. अवघे विश्‍व, कार्यक्षेत्र असलेल्या भारती विद्यापीठाच्या शाखा अमेरिका व दुबई येथे सुरु झाल्या आहेत. सदैव नाविन्याचा ध्यास, गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही. त्यामुळे डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या प्रगल्भ ध्यासातून भारती विद्यापीठाने फार मोठी झेप आंतराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे.

मा. साहेब बऱ्याचवेळा आपल्या भाषणात सांगतात की, एखादा पुरुष शिकला तर त्याच्या एकट्यातच बदल होतो. पण एखादी स्त्री शिकली तर दोन घरे सुशिक्षित होतात. त्यामुळे संपुर्ण समाज बदलतो आणि म्हणूनच साहेबांनी कडेगांव सारख्या छोट्या गांवात जेथे ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणी आपल्या आईच्या नावाने कन्या महाविद्यालय सुरु केले, त्यामुळे परिसरातील नाही तर आसपासच्या 
ब-याच मुली आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करु शकल्या. मुलींना राहण्यासाठी उत्तम वसतिगृह बांधले आहे. शैक्षणिक विकासाबरोबर भारती सहकारी बँक, भारती सहकारी ग्राहक भांडार, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, कुकुटपालन, दूधसंघ आणि इतर सहकारी संस्था स्थापन केल्या आणि शेकडो लोकांना नोकरीची संधी लाभली. ज्यापद्‌धतीने शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कार्य केले. त्यांच तोडीने सहकारातही काम केले. त्यांच्या सर्व संस्थांचा आदर्श इतरांना निश्‍चितच अनुकरणीय असा आहे. भान ठेवून योजना आखणांर आणि बेभान होऊन त्या राबविणांर हे अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे समाजाला पडलेलं गोड स्वप्नच असावं. शैक्षणिक व सामाजिक कार्यात भर घालावयाची असेल आणि समाजाची सेवा अखंड करावयाची असेल तर राजकारणाची मदत आवश्यक आहे आणि म्हणूनच लोकांच्या आग्रहाखातर राजकीय क्षेत्रात उडी घेतली. कोणतीही गोष्ट साध्य करताना मा. साहेबांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. लोकांच्या आग्रहास्तव १९८५ साली मा. साहेब विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले आणि पंचवीस हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यानंतर १९९० साली काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभेसाठी उभे राहिले व निवडून आले. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्जितावस्था यावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत. दुष्काळी भागाचा कायापालट करणारी ताकारी योजना पुर्णत्वाला यावी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याच बरोबर शेतकऱ्यांना वरदान ठरणारा टेंभू प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठविला. ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या घरामध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम मा. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी केले आहे. जून १९९१ पासून  मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री व नंतर उच्च व तंत्रशिक्षण, सेवायोजन, उद्योग व जलसंधारण, वाणिज्य व व्यापार, सहकार, पुनर्वसन आणि मदत कार्यमंत्री ही केंबीनेट खाती मोठ्या दिमाखाने, आत्मविश्‍वासाने व समर्थपणे सांभाळली. 

आधुनिक महाराष्ट्राच्या समाजकारणात मा. साहेबांचे कर्तृत्व हे चौफेर होते. राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सहकार सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले, साहेब म्हणजे महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात अनेक नावीण्यपूर्ण व विधायक उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्याच्या विकासाला हातभार लागला आहे. कला, समाजकारण, राजकारण, अर्थकारण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यांच्या नव्हे तर देशांच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. राजकारणामध्ये यश मिळविणे आणि ते दीर्घकाळ सातत्याने टिकवून ठेवणे सहजासहजी शक्य होत नाही याला मा. साहेब अपवाद होते. कारण त्यांनी राजकारणासाठी कधी राजकारण केले नाही. त्यांनी केले ते विकासाचे राजकारण समाजातील गोर -गरीबांच्या विकासाठी झटणं, त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करुन देणं या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती. 

स्वकर्तृत्वाने शिक्षणक्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या मा. साहेबांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक संपूर्ण पिढी त्यांच्या पायवाटेवरुन मार्गक्रम करीत आहे. खरं म्हणजे असा बहुआयामी एक कर्तृत्वसंपन्न लोकनेता महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. मा. साहेबांचे सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळयाचे, आपुलकीचे नाते निर्माण झाले. ज्या नेतृत्वाची नाळ सामान्यातल्या सामान्य माणसांशी जोडलेली असते, असे नेतृत्व सर्वसामान्यांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान झालेले असते असे सामान्यांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजविण्याचे भाग्य फार थोडया नेत्यांच्या नशीबी असते. अशा नशीबवान नेत्यापैकी आदरणीय साहेब हे एक होय.

सूर्य कधीच मावळत नसतो, तो जातो दुसरीकडे प्रकाश देण्यासाठी. याच पध्दतीने भारती विद्यापीठाच्या माध्यमातून अखंड उर्जा देणारा ज्ञानसूर्य म्हणजे डॉ. पतंगराव कदम साहेब. आज जरी देहाने साहेब नसले तरी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रातून त्यांनी केलेल्या कार्यातून ते चिरंतन आहेत. भौतिकशास्त्रात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार डॉ. पतंगराव कदमसाहेब हे शैक्षणिक व सामाजिक कायाचे अखंड ऊर्जास्त्रोत आहेत.

(Dr. Patangrao Kadam)