Header Ads

Loknyay Marathi

ग्रंथपालांनी वाचनाची आवड निर्माण करावी: डॉ. राजेंद्र कुंभार


ग्रंथपालांनी वाचनाची आवड निर्माण करावी: डॉ. राजेंद्र कुंभार 
सांगली | दि.३०/१२/२०१५


     फेसबुक, व्हाट्सअप सारख्या माध्यमातून मिरणारे ज्ञान हे बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीवर आधारित असते. यामुळे खऱ्या जिज्ञासूला वाचनाची आवडही यातून निर्माण होवू शकते. हे ओळखून ग्रंथपालांनी आपल्या कौशल्याचा विकास करून जास्तीतजास्त विद्यार्थी ग्रंथालयात कसे येतील याचा विचार करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभागातील डॉ. राजेंद्र कुंभार यांनी भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना केले.

     या चर्चासत्रात डॉ. राजेंद्र कुंभार यांचे बीजभाषण आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटनकरण्यात आले. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या महाजालात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून, ग्रंथालयातील माहिती अद्ययावत ठेवण्यात येत असली तरी विद्यार्थी या ग्रंथालयाकडे आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजण्याची गरज आहे. इंटरनेटच्या मायाजालात नामवंत ग्रंथालये जोडण्यात आली आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. या वेळी बीजभाषणात डॉ. कुंभार म्हणाले, की विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात दुरावा निर्माण होत आहे. मात्र समाजमाध्यमातून कॉपी-पेस्टचा जमाना येत आहे. याऐवजी प्रत्यक्ष वाचनच जिज्ञासूला खरा आनंद मिळवून देवू शकते हे ग्रंथपालांनी सांगण्याची गरज आहे. बदलत्या युगातही वाचनाला पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.

     प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी स्वागत केले व ग्रंथपाल प्रा. जे.डी. हाटकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विविध प्राध्यापकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच.एम. कदम, एन.सी.एल. चे डॉ. नंदकुमार दहिभाते, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. डी.बी. सुतार, डॉ. इनामदार इ.उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)