डॉ. शिवाजीराव कदम सर: 'घट्ट नातं गुणवत्तेशी, माती आणि माणसांशी'
डॉ. शिवाजीराव कदम सर: ‘घट्ट नातं गुणवत्तेशी, माती आणि माणसांशी’
- प्राचार्य
डॉ. विवेक रणखांबे,
भारती
विद्यापीठाचे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
या
लेखाच्या अगदी सुरुवातीलाच डॉ. शिवाजीराव कदम सरांच्या भव्य-दिव्य अशा
अमृत-महोत्सवी सोहळ्याचे मुख्य आयोजक, भारती विद्यापीठाचे सन्माननीय कार्यवाह मा.
डॉ. विश्वजित कदम सर यांना, भारती विद्यापीठ परिवारातील सर्व सदस्य आणि कडेगाव-पलूस मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते
यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन केल्या बद्दल मी मनापासून धन्यवाद देतो.
समाजात ज्या वेळी, कौटुंबिक नाते-संबंधांची वीण सैल होते आहे, नात्यातील आपुलकी
झपाट्याने क्षीण होत आहे, एकत्र कुटुंब पद्धतीतून समाज झपाट्याने फारकत घेतो आहे,
त्यावेळी मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पश्चात, कदम कुटुंबियांच्या या विशाल
परिवाराची वीण मात्र सैल झालेली नाही आणि याचे सर्व श्रेय हे, हा परिवार बांधून
ठेवणाऱ्या, मा. डॉ. विश्वजित कदम यांच्या संस्कारक्षम व्यक्तिमत्वासच द्यावे
लागेल.
आपले
जेष्ठ चुलते मा. मोहनशेठ कदम यांचा वांगी (ता. कडेगाव) येथे साकारलेला सहस्र-चंद्र
दर्शनाचा सोहळा असो, डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्या अमृत-महोत्सवी वर्षारंभी,
देशातील नामवंत शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत पुण्याच्या ‘जे-डब्ल्यू मॅरीएट’ हॉटेल
मध्ये, पार पडलेला सोहळा असो, की आता दि. १४ जून, २०२६ रोजी सरांच्या वाढदिवसाच्या पूर्व-संध्येला,
भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने संपन्न होत असलेला सोहळा असो, या सर्व
सोहळ्यांच्या भव्य-दिव्य आयोजनातून डॉ. विश्वजित कदम हे ‘नात्यांच्या जपणुकीचा एक
महत्वाचा संस्कार’ पुढे नेताना दिसतात. नात्याने आपले कर्तृत्ववान चुलते; तसेच
विद्यापीठाच्या कुलपती पदी असणाऱ्या आपल्या काकांच्या प्रति, कृतज्ञता व्यक्त
करताना दिसतात. त्यांची ही कृती भारती परिवारातील प्रत्येकाला मान्य होणारी,
भावणारी आणि अनुकरणीय आहे. किंबहुना ती एका व्यापक सामाजिक अपेक्षेच्या
अभिव्यक्तीचे भव्योदात्त रूपच आहे, असेच
म्हणावे लागेल.
माझ्यासाठी
आणि डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्या आयुष्यात आलेल्या हजारो लोकांसाठी, डॉ.शिवाजीराव
कदम हे एक अजब रसायन आहे. ज्या पिढ्यांच्या लहानपणी प्राथमिक शाळांना ‘जीवन शिक्षण’
मंदिर म्हणायचे, देशाच्या
इतिहासात ज्या ज्या लोकांच्या पिढ्या शाळेसाठी मैल-मैल चालल्या,
गावातल्या मुक्कामाच्या एकमेव ‘एस. टी.’ने आलेल्या डब्यांच्यावर कधी कधी ज्यांनी
दोन दोन दिवस काढले’,
कर्मवीरांच्या कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेल्या,
आणि ‘मूल्य-संस्करांच्या बरोबरच गुणवत्तेशी भक्कम नातं सांगणाऱ्या, ज्या भूमीच्या
पाचवीला दुष्काळ पुजलेला,
त्या भूमीच्या पोटी बारमाही कोरडवाहू शेती करणाऱ्या कुटुंबात ज्यांचे जन्म झाले,
अशा पिढ्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. शिवाजीराव कदम सर यांचा परिचय करून द्यावा
लागेल.
सरांचे जेष्ठ वडील बंधू मा.श्री.मोहनशेठ
कदम तथा दादा आणि दुसरे बंधू भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती मा.डॉ.पतंगराव
कदम साहेब यांच्या समवेत, प्रदीर्घ काळ समाज-जीवनाचा प्रवास करीत असताना,
व्यक्तिगत आयुष्यात ‘कमवा आणि शिका’ या योजनेतील विद्यार्थ्या पासून; देशातील A++ अशी गुणवत्ता
प्राप्त विद्यापीठाच्या कुलपती पदापर्यंत सरांनी केलेली वाटचाल, ज्यांच्या
अस्तित्वाच्या काहीच पाउलखुणा अस्तित्वात नव्हत्या त्या अवस्थेपासून हजारो
संसाराच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या अस्तित्वाच कारण होईपर्यंत, मा. साहेबांच्या
सोबत डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी केलेला एकूण सारा जीवन प्रवास, आपल्याला
विस्मयचकित करून सोडतो.
सरांच्या
आयुष्यावर आई बयाबाई आणि वडील श्रीपतराव,
यांच्या साधेपणाचा आयुष्यावर मोठा प्रभाव. सर सांगतात त्या प्रमाणे त्यांच्या
आई-वडिलांचं ते साधेपण, सरांना आजही जमिनीवरून चालायला शिकवतं,
गर्वाची बाधा होऊ देत नाही.‘कुठेही पोहोचलात, तरी कुठून आलात?’,
ते विसरू नका, हा निष्ठेचा पोत, ‘कुणाकडून कणभर घेतलंत, तर त्याला मणभर परत करा’,
हा कृतज्ञतेचा संस्कार, ‘मातीत ज्यांचे जन्म मळले,
ती माणसं आपली मानण्याची आणि त्यांच्यासाठी जगण्याची भावना’,‘सुखाचे
क्षण चुकले तरी चालतील, पण दु:खाच्या क्षणी शेजारी उभी राहण्याची शिकवण’ सोनसळच्या
मातीने,
माणसांनी आणि आई-वडिलांच्यासह वडील भावांनी दिली. त्यामुळे आयुष्यभर काम करताना,
रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा-शिका या योजनेचा विद्यार्थी ते भारती विद्यापीठ अभिमत
विश्वविद्यालयाचा कुलपती’ होईपर्यतच्या प्रवासात बदललो नाही.‘मी गावाकडचा,
गावातला,
ग्रामीण महाराष्ट्रातून आलेला एक’
हाच माझा परिचय; मला कर्तृत्वाच्या अनेक बिरुदापेक्षा अधिक महत्वाचा वाटतो, असं
सांगणारे सर आपल्यावर एक आगळा-वेगळा संस्कार करून जातात.
केवळ मतदार संघातच नव्हे तर
शिक्षणासह जीवनाच्या विविध क्षेत्रांशी जोडले गेलेले सर आपल्या आयुष्याचं रहस्य
उलगडताना सांगून जातात की वडील बंधू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या मुळे ‘आयुष्यात
काम करण्याची मिळालेली संधी आणि दररोज नव्या संकल्पांशी जोडून घेण्याचं लाभलेलं
भाग्य सरांना महत्वाचं वाटतं.’त्या संकल्पांच्या परिपूर्तीसाठी सरांनी स्वत:ला
रात्रंदिवस झोकून दिलं. ते संकल्प समाज उभारणीचे होते. माणसांचे संसार उभारण्याचे
होते. ‘जे जे हाती येत होतं, ते ते आयुष्यातील इतरेजनांच्यासाठी’ वाटण्याचे होते.
त्यामुळेच मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारती
विद्यापीठासारखी संस्था पुढे नेताना,‘जो जो आयुष्यात आणि जसा जसा आला,
त्याला ‘तो तो माणूस जसा होता तसा’च त्यांनी सोबत घेतला’. त्याच्या अंगी असणाऱ्या
क्षमता विकसित करण्याची त्याला संधी दिली. इतरांना समजून घेण्याचे सरांच्या मनाचे
हे मोठेपण आपल्याला भावल्याशिवाय रहात नाही.
आजवरची आयुष्याची सारी वाट ही सर मोठ्या
विश्वासाने; कामाची जबाबदारी सोपविणाऱ्या वडील भावांशी आणि स्वत:शी प्रामाणिक रहात
चालले,
त्यापोटी वाटणाऱ्या समाधाना परते त्यांच्यासाठी दुसरे पारितोषिक नाही. शिक्षण
क्षेत्र, सहकार असो कि राजकारण, सर हे ‘अजातशत्रू’ म्हणून प्रसिध्द आहेत. पुणे
विद्यापीठाच्या निवडणूकांच्या निमित्ताने,
अनेकदा सरांना निवडणुकांचा सामना करावा लागला,
परंतु त्यांनी प्रतिस्पर्ध्याचे शत्रू मध्ये रुपांतर होऊ दिले नाही. पाठीशी
अल्प-स्वल्प अनुभव असताना,
अभ्यासमंडळे,
अधिष्ठाता,
सिनेट,
विद्वत परिषद,
व्यवस्थापन परिषद आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अशा कितीतरी निवडणुका सर लढले आणि
विक्रमी मताधिक्याने जिंकले,
पण त्या यशाचे,
इतरांच्या कडून असुयेत आणि सरांच्याकडून दुराभिमानात कधीच रुपांतर झाले नाही.
आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, आप-पर भावरहित जीवन जगत पुढे जाताना आज कुणी
शत्रू नाही,
कुणाचे कसलेही आणि काहीही नुकसान केल्याचे सरांना स्मरत नाही,
याचे सारे श्रेय सर संचिताला देतात.
यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या
स्थापनेपूर्वी एक वर्ष आधी,
अर्थात १९७७ साली भारती विद्यापीठात सुरु झालेला सरांच्या लौकिक सेवेचा प्रवास,
१९८१ ते २००६ या पुना कॉलेज ऑफ फार्मसीच्या ‘प्राचार्यपदाच्या रौप्यमहोत्सवी
कारकीर्दी’च्या रूपाने ऐतिहासिक होवून गेला. फार्मसी कॉलेजचे ‘प्रथम प्राचार्य’
म्हणून काम करताना,
पुणे विद्यापीठासाठी सर काही मुलभूत आणि पायाभूत योगदान देऊ शकले,
पुणे विद्यापीठात फार्मसी या एका स्वतंत्र विद्याशाखाची मुहूर्तमेढ रोवता आली,
प्राचार्यपदाच्या सुमारे २५ वर्षांच्या काळात,
राज्यात फार्मसी कॉलेजेसचे एक मोठे जाळे उभे राहिले,
अनेक संस्था आणि कॉलेजेसना सर प्रसंगी मदत करू शकले,
विद्यार्थी आणि प्राचार्यांच्या अनेक पिढ्या उभ्या करू शकले,
याची कृतार्थता शब्दातीत असल्याचे सर वारंवार उर्धृत करतात.
प्रदीर्घकाळ
भारती विद्यापीठाचे सह-कार्यवाह,
कार्यवाह,
विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू, कुलगुरू आणि आज कुलपती म्हणून काम करताना, सरांचा
अक्षरश: हजारो लोकांशी संबंध आला. स्वत: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याने
समोरच्याला स्वत:च्या प्रश्नाबद्दल, समस्येबद्दल फारसं बोलण्याची गरज लागायची
नाही. आलेल्या प्रत्येकाची आयुष्यं ही सरांच्यासाठी एकेक कथा असायची ,
त्यात परिस्थितीचे चटके सोसत आपल्या मुलांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न
पाहणाऱ्या असहाय पालकांच्या असहाय्य पिढ्या होत्या,
त्यांचे प्रश्न शैक्षणिक,
चरितार्थाचे आणि बहुतेकवेळा आर्थिक
सोडवणुकीचेच असायचे. मा.साहेबांच्या सोबत,
संस्थेची साधन-संपत्ती,
उपलब्ध निधी,
संस्थेने काढलेली कर्जे याचा मेळ घालीत,
जेवढी करता आली,
तेव्हडी मदत सरांनी सर्वांनाच आयुष्यभर केली. सरांच्या दारातून कधीच कोणी विन्मुख
गेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाचा सदस्य म्हणून देशातील नामांकित विद्यापीठाना
निधीवाटप करण्याचा,
त्यांच्या कामाशी जोडून घेण्याची, शैक्षणिक आणि संशोधनात्मक अभ्यासाची सरांना संधी
मिळत गेली.जिथे जिथे ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिसल्या,
त्या त्या आपल्या विद्यापीठात हव्यात,
या ध्यासापोटी सरांनी झपाटून काम केले. काम करताना प्रसंगी पदाचा, नांव लौकिकाचा
कोणताही अभिनिवेश त्यांनी केला नाही. एका पावसाळ्यात तर वाय एम कॉलेजच्या
बेसमेंट मध्ये असलेल्या लायब्ररीत पावसाचे पाणी साचले. पुस्तके पाण्यात भिजणार,
तोवर भर रात्री सर एकटेच तिथे पोहोचले आणि त्यांनी ती शेकडो पुस्तके सुरक्षितस्थळी हलविली. सरांच्या ठायी वसलेलं हे
साधेपण आपल्या मनाला भावल्याशिवाय रहात नाही.
संशोधन
हा सरांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव. त्यांनी आयुष्यभर संशोधनास चालना दिली.
कुलगुरू पदाच्या काळात त्यांनी संशोधनास विशेष प्राधान्य दिले. माझे पीएच. डी.चे
संशोधन पूर्ण होताच, त्यांनी आम्हां उभयतांना पुण्याला नेले. धास्तावलेल्या आमच्या
मनी विश्वास निर्माण केला. आज जगातील कितीतरी देशांत कॉन्फरन्सेस साठी जाऊन आलो,
कुटुंब संपन्नता अनुभवीत आहे. याचे सारे श्रेय हे साहेब, वहिनीसाहेब आणि सरांनी
आणि त्यासोबत पुढच्या पिढीत डॉ. विश्वजित कदम सर यांनी दिलेल्या प्रेमालाच द्यावे
लागेल.
प्राध्यापकांनी
शिकविण्यासोबत संशोधन केले पाहिजे,
हा सरांचा दंडक होता. सरांची पीएच. डी. हे साहेबांचे स्वप्न होते,
त्याची पूर्तता झाल्याचे सरांनी साहेबांना सांगताच त्यांचा फुललेला चेहरा सरांना
आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा रहातो.
संशोधनाच्या याच धासातून पुढे पुना कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जा
लाभलेल्या विशेष अशा फार्मास्युटीकल संशोधन संस्थेची स्थापना झाली. औषधनिर्माण
क्षेत्रात प्रचंड काम झाले,
फार्मास्युटिकल सायन्सेसचे हजारो विद्यार्थी बाहेर पडले. प्राध्यापक,
प्राचार्य,
कुलगुरू आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार
झालेले डॉ. आत्माराम पवार आणि डॉ. वर्षा पोखरकर यांना नुकतेच जगातील अग्रगण्य आणि
प्रतिष्ठित ५% शास्रज्ञात स्थान मिळाले, सलग चार वर्षाहून अधिक वेळा, पूना कॉलेज
ऑफ फार्मसीचे प्राध्यापक स्टॅन्फर्ड विद्यापीठाच्या २% शास्त्रज्ञांच्या यादीत
समाविष्ट झाले, याचे सारे श्रेय हे डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी स्थापनेपासून घेतलेल्या
कष्टाला आणि त्यांच्या संशोधन-प्रधानता लाभलेल्या व्यक्तीमत्वालाच द्यावे
लागेल.
व्यक्तिगत मला या कदम कुटुंबियांच्या सोबत, त्यांच्या परिवारातील
एक घटक होत गेली ३४ वर्षे जवळून काम करण्याची संधी लाभली. या कदम कुटुंबियांसाठी
‘जनता-जनार्दनाचे’
दर्शन, हेच ‘देवदर्शन’ आहे, हे मी आयुष्यभर अनुभवलं आहे. माणसं हेच कदम
कुटुंबियांच्या ‘जगण्याचे औषध’ आहे. तीच त्यांची चिरंतन उर्जा आहे. त्यांच्यासाठी
ते एक अद्वैतस्वरूप नाते आहे, ईश्वराचे
निर्गुण निराकार रूप आहे. सामाजिक, शिक्षण आणि सहकार या सर्वच क्षेत्रातील कितीतरी
उच्च पदांचा सरांना अनुभव आहे. मा. साहेबांच्या मंत्रिपदाच्या निमित्ताने,
प्रदीर्घकाळ राजकीय सत्ता सरांनी जवळून अनुभवली आहे,
परंतु ही सर्व पदे ही व्यक्तिगत सुखासाठी त्यांनी कधीच वापरली नाहीत.सत्ता हे
समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून वापरले. या सामाजिक कृतज्ञतेच्या
संस्कारातूनच कदम बंधूंनी हजारो संसार उभारले.
आपल्यापैकी कुणीही, कधीही सरांना
पूर्वग्रहदूषित होत काम करताना कधीच अनुभवलेले नाही. त्यांनी
कुणाबद्दल कधीही कसलाही आकस धरला नाही,
वैरभाव तर दूरच, नेहमी दुसऱ्या साठी काय करता येईल,
आपल्या आयुष्यातील इतरांचे आयुष्य; ‘ते जिथे आहे तिथून; पुढे कसे नेता येईल’?
त्याला काय मदत करता येईल?
याचाच विचार करीत,
प्राप्त साधनांनिशी इतरांच्या आयुष्यात उभे रहाण्याचा सरांना जणू छंदच जडला आणि
तोच छंद आयुष्यभर पुरा करीत आज ते अमृत-महोत्सवाच्या टप्प्यावर उभे आहेत.
आज जे सुख दारी उभं आहे त्याच्या पायाशी
कितीतरी कष्टाचे, यातनांचे दिवस आहेत ते दिवस परत परत फिरून मनात येतात आणि
जगण्याची उर्जा देऊन जातात. सर सांगतात की साहेब नेहमी म्हणायचे ‘अरे ध्येय मोठं
ठेवा,
स्वत:चा संसार तर सगळेच करतात,
आपण जगाचा संसार करुया’. प्रचंड प्रवास, कामाचे
नियोजन, काम
पूर्ण होण्यासाठी प्रसंगी तास अन तास अधिकारी आणि मान्यवरांची बघितलेली वाट,
आलेल्या
अनंत अन अवघड अडचणी, ‘संकल्पना,
कागदावर केलेले नियोजन आणि त्या नियोजनाची प्रत्यक्षात केलेली पूर्तता’ या
प्रक्रियेशी स्वत:ला जोडताना आयुष्य कधी धन्य झालं ते कळलच नाही, अशीच सरांच्या
आयुष्याची आजची स्थिती.
भारती
विद्यापीठाच्या बांधकाम समितीचा अध्यक्ष या नात्याने सरांनी केलेल्या कामांच्या
परीपुर्तीचे दर्शन,
उभ्या राहीलेल्या देखण्या गगनचुंबी इमारती,
सरांच्या कार्यवाह पदाच्या काळात विद्यापीठाचा होत गेलेला विस्तार, नव्या
आव्हानांचा होत असलेला यशस्वी पाठलाग,
नॅक (NAAC) सारख्या महत्वाच्या
संस्थेकडून, २००४,
२०११,
२०१७ मध्ये मिळालेल्या सर्वोत्तम ग्रेड्स आणि नुकत्याच २०२४ मध्ये 3.60 CGPA सह मिळालेली ‘A++’ ग्रेड, विविध
महाविद्यालयांच्यासाठी त्यांच्या संबंधित गव्हर्निंग कौन्सिल्स कडून मिळालेल्या
मान्यता,
त्या मिळविताना आलेल्या प्रचंड अडचणी,
त्यावर केली गेलेली मात,
संस्थेच्या विस्तारासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेत मिळविलेल्या जमिनी,
अशा एक ना अनेक. प्रत्येक शाखेच्या उभारणीच्या
स्वतंत्र कथा आहेत. आज अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तो सारा प्रवास
सरांच्या डोळ्यासमोरून जात असेल.
‘सोनसळ’
हे सरांचं गांव. सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर, चौरंगीनाथाच्या
डोंगरकुशीत वसलेलं आणि ग्रामदेवता‘आई उदगिरी’च्या आशिर्वादानं पावन झालेलं;
हजार-बाराशे लोकवस्तीच हे गांव. दुष्काळ हा गावाच्याच काय, साऱ्या तालुक्याच्या
पाचवीला पुजलेला. गावात वीज नव्हती,
पाणी नव्हतं. रस्ते नव्हते. त्यावेळी गावात कोणी आजारी पडलं तर ज्याच्याकडे
बैलगाडी होती, त्यांचे पेशंट बैलगाडीनं,
इतरांना मात्र त्यांना खांद्यावरून किंवा चादरीची डोली करूनच न्यावे लागे. ती
परिस्थिती आठवली तरी सरांच्या अंगावर आजही काटा येतो. आणि म्हणूनच की काय कितीही
गडबडीत असले तरी, सर मात्र हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या भागातल्या पेशंटची विचारपूस
करायला आजही प्राधान्य देताना दिसतात. गतकाळाच्या त्या परिस्थिती मुळेच, त्यांच्या
ठायी आजही माणूसपण जिवंत आहे, हे आयुष्यात
ते महत्वाचे मानतात.
सर
अशा परिस्थितीत जन्माला आले की जिथे लढण्यासाठी साधनच नव्हते. त्यापोटीच तर आई,
तात्या, दादा (जेष्ठ बंधू मोहनशेठ),
आणि आण्णांचा (मा. पतंगराव कदम साहेब) यांचा एकच आग्रह असायचा, कि ‘शिवाजी तू
शिकलं पाहिजेस!’
सरांच्या पेक्षा पेक्षा ति.दादा (मोहनशेठ) आणि ति. आण्णांनी (साहेबांनी) अधिक कष्ट
सोसल्याचे, लहान-धाकटे असल्याने आम्ही थोडे मळलेल्याच; पण ज्या वाटेने दादा-आण्णा
चालले, त्या वाटांनीच चाललो, असेही सर आवर्जून सांगतात. पण या परिस्थितीच्या
धक्क्यांनी आणि धाग्यांनी नात्यांचा जोड
असा काही पक्का विणला,
की त्याची वीण आजही तिसऱ्या पिढीत कायम आहे.
आजही
सरांना घराबाहेर टाकलेल्या त्या पहिल्या वहिल्या पावलाची, अवघडपरिस्थितीशी
दिलेल्या लढ्याची आठवण येते. तांत्रिक शिक्षण घेतल्यास नोकरी मिळू शकते,
या आशेने प्राथमिक शिक्षणा नंतर सर
रामानंदनगर (किर्लोस्करवाडी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या तंत्रविद्यालयात
मुख्याध्यापक श्री. बी. बी. खोत यांच्या समोर उभे राहिले. मॅट्रिक होईपर्यंत
शिकत-शिकत, ते दररोज चार तास काम करायचे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुठं जायचं?
हा प्रश्न होताच. त्या काळात,
कोल्हापूरचे ‘राजाराम कॉलेज’,
सोलापूरचे ‘दयानंद’ आणि सांगलीच्या ‘विलिंग्डन कॉलेज’चा मोठा लौकिक होता.पण सरांनी
यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेल्या कराडच्या ‘सायन्स कॉलेज’
मध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केलं. दररोजचा डबा एस. टी. ने यायचा. त्यात सकाळ
आणि संध्याकाळचे एकदमच आणि एकच जेवण असायचे. स्टॅँडवर डबा आणायला जायचे आणि रिकामा
डबा परत पोहोचवायला जायचे. वयाच्या पंच्याहत्तरीत ‘एस.टी.’ने डबे येणाऱ्या
मित्रांची आणि सरांची मैत्री आजही कायम आहे. ‘आजही आम्ही वेळात वेळ काढून भेटतो.
त्या दिवसांच्या आठवणी; आज नव्याने जगायला बळ देतात,
ताज्यातवान्या करतात,’ आयुष्याला बळ देऊन जातात, या आठवणीत रमताना पाय जमिनीवर
रहातात, हे सांगताना सर भविष्यातील पिढ्यांच्यावर ‘कृतज्ञतेचा’ संस्कार करून
जातात.
सरांनी
‘फूड अँड ड्रग्ज’ या विषयात पदवीधर व्हावं; असं साहेबांचं मत होतं. त्यासाठी सर
मुंबईला माटुंग्याला गेले. नाशिकला
एम.एस्सीचे पहिले वर्ष आणि ट्रान्सफरने पुणे विद्यापीठातून दुसरे वर्ष पूर्ण करीत
‘एम. एस्सी’ झाले. पण साहेबांना मात्र सरांनी ‘पीएच.डी.’ होणे अपेक्षित होते. या
पीएच. डी. ची आठवण सांगताना सर म्हणतात, कि साहेबांनी आणि मी एकाच दिवशी
‘पीएच.डी’चे रजिस्ट्रेशन केले. पुणे विद्यापीठातील सरांचे शिक्षक आणि पुढे संशोधन
मार्गदर्शक झालेल्या डॉ. बाळासाहेब तथा बी. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली
त्यांनी पुढे पीएच.डी. केली. ‘माझा रिझल्ट आणायला साहेब स्वतः विद्यापीठात गेले
होते आणि त्यांनी तिथेच सर्वांना स्वतः पेढे वाटले होते’,
या आठवणींनी आजही सरांच्या पापण्यांच्या कडा आजही पाणावतात.
१९७७
चा तो काळ असावा, जेंव्हा भारती विद्यापीठाची स्थापना होवून जवळपास १० वर्षाहून
अधिक काळ लोटला होता. या आधी उर्धृत केल्याप्रमाणे,
सर या आधीच भारती विद्यापीठात रुजू झाले होते. शंकरराव मोरे विद्यालयाच्या
निमित्ताने संस्था नावारूपाला येत होती. १९७८ साली संस्थेचे पहिले कॉलेज ‘यशवंतराव
मोहिते महाविद्यालय’ सुरु झाले आणि पहिले पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून सर रुजू
झाले. त्याचवर्षी संस्थेने,
आय.एम.ई.डी आणि न्यू लॉ कॉलेजची स्थापना केली. १९८१ साली पुना कॉलेज ऑफ फार्मसीची
स्थापना होत,
सरांच्याकडे प्राचार्य पदाची जबाबदारी आली. तेंव्हापासून सुरु असलेला संशोधनाचा
यज्ञ, आज फार्मसी कॉलेजला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून देणारा ठरला. आज
महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक हे; ‘पुना
कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी आहेत, याचा सरांना अभिमान वाटतो. सरांनी विविध समाज
घटकांना केलेल्या प्रासंगिक पण अमूल्य मदतीपोटी, अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेतून,
महाराष्ट्रात डॉ. शिवाजीराव कदम यांच्या नावाने आज काही ज्ञानयज्ञही सुरु
आहेत.
मा.
साहेबांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षण क्षेत्रात गुणवत्तेने पुढे जात असलेली
भारतीची सर्वच महाविद्यालये,
त्यांच्या देखण्या इमारती,
हे भारती विद्यापीठाचे वैभव आहे. देशातील वेगवेगळ्या अभ्यास क्रमांसाठीच्या
वेगवेगळ्या कौन्सिलच्या नियमानुसार,
बिल्डिंग्जचे बांधकाम करणे,
उपलब्ध असणाऱ्या जमिनींवर नियमांना अनुसरून बांधकाम करीत,
त्या
त्या शहरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या देखण्या इमारती उभ्या करणे,
त्यांचे अॅप्रुव्हल घेणे,
आवश्यक स्टाफ-मशिनरी,
सोई, सुविधा निर्माण
करणे,
हे काम करणे, हे वाटते तितके सोपे नव्हते. मेडिकल कौन्सिल,
आयुर्वेद,
आर्कीटेक्चर,
फार्मसी,
होमिओपॅथी, AICTE अशा कितीतरी कौन्सिल्स कडून मान्यता
मिळवीत, या बंधुद्वयांनी महाविद्यालये सुरु केली.
एकीकडे
साहेबांची दूरदृष्टी आणि दुसरीकडे सरांच्या
स्तरावर परिपूर्तीसाठी केला गेलेला ‘कामाचा वेगवान पाठलाग’, यातून पुणे,
मुंबई,
दिल्लीसह,
सांगली,
कोल्हापूर,
सोलापूर,
कराड,
कडेगांव, जव्हार,
पांचगणी अशी भारती विद्यापीठाची शैक्षणिक संकुले आकारास आली. एकूणच दिनक्रम खूपच
व्यस्त असायचा. दिवस भरात ते शे-दोनशे लोकांना भेटायचे,
त्यांच्या समस्या सोडवायच्या,
सेवकांच्या समस्या सोडवायच्या. संस्थेतील असो कि संस्थेबाहेरील,
सरांच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे स्वत:चे घर असावे,
हा अट्टहास. भारती विद्यापीठात त्याला नोकरी,
भारती बँकेकडूनच कर्ज,
ते ही विशेष योजनेसह कमी व्याज दरात,
शक्य असेल ती ती सर्व मदत करीत; त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप होत आजवरच्या प्रवासात
कधी थकल्याच त्यांना आठवत नाही.
या अमृतमहोत्सवी आयुष्यात पुणे
विद्यापीठाशी सरांचे मनस्वी संबंध राहिले. तत्कालीन पुणे विद्यापीठाचा विस्तार
प्रचंड होता. पुणे,
नगर, नाशिक,
जळगाव,
धुळे जिल्ह्यात विस्तारलेल्या या विद्यापीठाचा प्रदीर्घकाळ अधिसभा सदस्य म्हणून,
१६ वर्षे विद्वतसभेचा सदस्य,
१८ वर्षे व्यवस्थापन परिषदेचा सदस्य,
स्थायी समिती सदस्य म्हणून सरांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. या विद्यापीठाच्या
सर्व पदांसाठीच्या निवडणुका लढणे आणि त्या विक्रमी मतांनी जिंकणे,
याचे सारे श्रेय हे सर या कामाची संधी देणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेबांना,
सरांच्या नेतृत्वक्षमतेवर आणि न्यायबुद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील
मतदारांना आणि झोकून देत काम करणाऱ्या सहकाऱ्यानाच देतात.
पुणे
विद्यापीठात, या काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून की काय,
पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू, जेष्ठ शास्त्रज्ञ मा.डॉ.वसंतराव गोवारीकर
साहेब आणि त्यानंतर जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. डॉ. अरुण निगवेकर साहेब यांनी त्यांच्या
कुलगुरू पदांच्या कालावधीत,
सरांना प्र-कुलगुरू म्हणून निमंत्रित केले होते, हा सरांचा मोठा सन्मान. सर
सांगतात, “ति. साहेबांचा माझ्यावर,माझ्या
क्षमतेवर प्रचंड विश्वास होता. त्यांच्या ठायी एक द्रष्टेपण होतं,
त्यांचे निर्णय ठाम असतं,
पण तो घेताना त्यांनी मला नेहमीच विश्वासात घेतलं. साहेबांच्या निर्णय प्रक्रियेचा
आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा मी नेहमीच एक भाग राहिलो. मी घेतलेल्या प्रत्येक
निर्णयाची साहेबांनी पाठराखण केली. माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला. असा वडीलभाऊ
होणे नाही, हेच खरे”. असे हे बंधूद्वय कितीतरी कुटुंबांच्या आयुष्यात साखर पेरीत
गेले.
विद्यापीठ
अनुदान आयोगाचा सलग दोन टर्म सदस्य म्हणून,
नॅक सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेवर सदस्य म्हणून सरांना काम करण्याची मिळालेली
संधी,
तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सलग दोन टर्म सदस्य होत, देशातील अनेक
विद्यापीठे आणि संस्थांना मदत करता आली, याबद्दल ते विशेष समाधान व्यक्त करतात.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून काम करताना सरांचा महाराष्टासह देशातील
अनेक विद्यापीठे,
मान्यवर संस्था यांच्याशी जवळून संबंध आला. ज्या रयत शिक्षण संस्थेत सर शिकले,
त्यांच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून,
महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचे विश्वस्त,
महात्मा गांधी हॉस्पिटलचा चेअरमन, अशा कितीतरी संस्थांची पदे भूषविता आली. असे हे
पदांना भूषण ठरलेले सर आज आपला अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत.
सरांच्या प्र-कुलगुरू पदाच्या काळात,
‘भारती विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार’ आणि ‘डी. लिट’ देण्याची सुरुवात झाली.
कितीतरी महनीय व्यक्तिंना या पुरस्कारांनी गौरविले. पदवीप्रदान समारंभास जागतिक
कीर्तीचे लोक यावेत,
यासाठी सर प्रयत्नशील प्रयत्नशील राहिले. याचेच द्योतक म्हणून नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ.अमर्त्य सेन
यांच्या उपस्थितीत संपन्न झालेली अखिल भारतीय अर्थशास्त्र परिषद,
देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची ‘कुलगुरू परिषद’,
‘फार्मसी कॉंग्रेस,’
अशा कितीतरी ऐतिहासिक समारंभांचे भारती विद्यापीठात आयोजन झाले. या काळात सोबत
विद्वतजनांची मांदियाळी असायची. सर्व क्षेत्रातील ज्ञान-समृद्ध आणि अनुभवी
तज्ञांचा अवतीभवती वावर असायचा. त्यामुळे घेतलेले निर्णय परिपक्व असायचे, याची
सरांना मोठी कृतज्ञता वाटते.
आजवर
सरांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार आदी क्षेत्रातील सेवेचा गौरव म्हणून
त्यांना कितीतरी पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाने दिलेला ‘आदर्श शिक्षक
पुरस्कार’,
ज्या कॉलेजमधून सर बी. एस्सी झाले,
त्या शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेला ‘कराड भूषण पुरस्कार’,
फुले-शाहू-आंबेडकर मंचाद्वारे मिळालेला ‘विचारवेध पुरस्कार’,
‘ऑल इंडिया फार्मास्युटीकल असोसिएशन’ने दिलेला सर्वोच्च पुरस्कार,
शिवाजी विद्यापीठ; रयत शिक्षणसंस्था, प्रवरा एज्युकेशन ट्रस्ट यांनी केलेले गौरव
आणि मार्च,
२०२५ मध्ये मिळालेला ‘पुणे विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार’,
हे सारे पुरस्कार,
सरांच्या अमृत् महोत्सवी प्रवासातील महत्वाच्या पाउलखुणाच म्हणाव्या लागतील.
सरांच्या
व्यक्तिगत आयुष्याच्या या प्रवासात, सरांच्या जेष्ठ वहिनी आणि मार्गदर्शक
मा.विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांनी त्यांना दिलेले प्रेम,
लहान-धाकटा दीर म्हणून केलेला सांभाळ,
आपल्या वडिलांच्या प्रमाणे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विशेष नेतृत्वक्षमता लाभलेले
भारती विद्यापीठाचे सन्माननीय कार्यवाह, डॉ. विश्वजित कदम, आपल्या स्थितप्रज्ञ आणि
नम्रवृत्तीने आम्हां सर्व कदम कुटुंबियांच्या मनात स्वत:चे एक आदराचे आणि
अभिमानाचे स्थान मिळविलेल्या सरांच्या सुनबाई सौ.स्वप्नाली,
भारती विद्यापीठ हेल्थ अफेअर्सच्या संचालिका डॉ.अस्मिता कदम यांचे ऋणनिर्देश
सरांना महत्वाचे वाटतात.
त्याच
प्रमाणे गेली सुमारे ४६ वर्षे ज्यांनी सरांना पत्नी म्हणून साथ दिली त्या सौ.
रंजना,
सरांची कन्या डॉ. सविता,
चिरंजीव डॉ. राहुल, सूनबाई डॉ. सौ. देवयानी आणि नातू चि.शिवांश यांचे उल्लेख
महत्वाचे. या साऱ्या कुटुंबियांप्रति भावना व्यक्त करताना सर सांगतात, ‘माझ्या
आयुष्यातील संकल्प पूर्ण करताना, ‘प्रथम तडजोड’ ही कौटुंबिक सुखाशीच’ करावी लागली,
याची मनाला सल आहेच. पण हा सारा प्रवास,
त्यांच्या सहकार्या शिवाय शक्य नव्हता,
हे मान्यच करावे लागेल. कदम कुटुंबियांचा रक्ता-नात्याचा आणि त्याहूनही जोडलेल्या
परिवार खूप मोठा आहे. हजारो कुटुंबियांच्या लग्न पत्रिकेत भावकी आधी कदम
कुटुंबियांचीच नावे असतात. या भावा-भावांच्या पोटी जन्माला आलेली मुले,
सुना आणि नातवंडे आजही एकत्र कुटुंबाचे भाग आहोत,
मनाने एकत्र आहोत;
सरांच्यासाठी याचे समाधान शब्दातीत आहे.
आज आयुष्याच्या अमृत प्रवासात, लौकिक
अर्थाच्या या कुटुंबा पलीकडे जात डॉ. शिवाजीराव कदम सर हे त्यांच्या आयुष्यातील
आलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे सदस्य झाले, त्यांच्या सुख-दु:खाशी एकरूप होत
गेले, परिवारा पलीकडे जात आपल्या सर्वांशी सरांनी जोडलेले नाते, रक्ताच्या
नात्याहून जोडलेल्या मोठे करीत गेले, तत्व आणि मूल्याधारित जीवन जगताना, ‘माती आणि
मातीतल्या माणसांशी असलेले नाते, अधिक दृढ करीत गेले’, असेच म्हणावे लागेल. डॉ. शिवाजीराव कदम नावाचा हा असा एक
अमृत-महोत्सवी प्रवास, आपल्या आयुष्याला धन्य करणारा, वरदायिनी उद्गीरीच्या
‘ईश्वरी कृपाशीर्वादाचा प्रसादच’ म्हणावा लागेल.

Post a Comment