डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास होणारे प्रथमोपचार प्रात्यक्षिक सादर
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास होणारे प्रथमोपचार प्रात्यक्षिक सादर
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास होणारे प्रथमोपचार प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच एखादी व्यक्ती बेशुद्ध झाल्यास त्या व्यक्तीस रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी दिला जाणारा प्रथमोपचार तसेच हाताची स्वच्छता याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जामवाडी येथील डॉ. सायली गिड्डे उपस्थित होते.
याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. पोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते. मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार’ घेणे आवश्यक ठरते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जामवाडी येथील डॉ. सायली गिड्डे व आशा वर्कर सौ. वंदना खाडे, मीनाक्षी सातपुते, सुजाता गंगणे, शारदा गवळी, वैशाली गायकवाड यांनी प्रथमोपचार तसेच हाताची स्वच्छता याविषयी माहिती दिली. आणि विविध आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास होणारे प्रथमोपचार प्रात्यक्षिके करून दाखवली.
यावेळी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए.एल.जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रुपाली कांबळे, प्रा.मंगेश गावित आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रुपाली कांबळे, यांनी केले. तर आभार प्रा. सौ. व्ही. ए. गावडे यांनी मानले. तसेच या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, एन.एन.एस.स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment