Header Ads

Loknyay Marathi

पोषक आहार व व्यायामामुळे असंसर्गजन्य आजारांवर मात शक्य - डॉ. कौशिक पाटील

पोषक आहार व व्यायामामुळे असंसर्गजन्य आजारांवर मा शक्य - डॉ. कौशिक पाटील

सांगली: हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास आणि त्याप्रमाणे आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते सकारात्मक बदल घडवू आणता येतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा असंसर्गजन्य आजारांवर मात करणे सहज शक्य आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला चालणे, धावणे, सायकलिंग, खेळणे आदींची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये रसायनशास्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय रक्तवाहिन्यासंबंधी आजार या विषयावरील वेबिनार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. यावेळी विज्ञान विभाग प्रमुख व प्राध्यापक प्रबोधिनी समन्वयक डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख टी. आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ए. आर. सुपले, डॉ. शिवाजी बोऱ्हाडे. डॉ. संतोष माने, डॉ. सौ. शिल्पा साळुंखे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की पाश्चात्यीकरण, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. सकस आहार, व्यायाम, योगा, पोहणे, खारवलेले पदार्थ व मांसाहार कमी करणे यामुळे हृदयरोग टाळता येतो. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. कणसे म्हणाले की, हृदय हा अवयव अतिशय महत्वाचा आहे. शरीरातील एखादा अवयव खराब झाला तर त्यावर पर्याय शोधता येतो. पण हृदयाे तसे नाही, म्हणून ते जपलेच पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी केले तर आभार डॉ. ए. आर. सुपले यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सौ. एस. वाय. साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.