रक्तदानातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ: डॉ. यशोधरा गोटेकर
रक्तदानातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ: डॉ. यशोधरा गोटेकर
रक्तदान हे पृथ्वीतलावरील सर्वात पवित्र दान असून रक्तदानाच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. रक्तदात्यांचे कार्य पाहून परमेश्वरालादेखील माणूस घडविल्याचा सार्थ अभिमान वाटत असेल असे प्रेरणात्मक उदगार भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी प्रमुख डॉ. यशोधरा गोटेकर यांनी काढले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त 'रक्तदान समज व गैरसमज’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डॉ. ए. आर. सुपले तसेच सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. गोटेकर म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात रक्ताची कमतरता जाणवत असली तरी तरुणांच्या कार्यामुळे रक्त उपलब्ध होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच आजची युवा पिढी सामाजिक जाणीवा समृद्ध असलेली पिढी आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कणसे म्हणाले की, दुसर्यासाठी जगणे हेच खरे जगणे आहे याची जाणीव कोरोनाने अवघ्या विश्वाला करून दिली आहे. दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो म्हणून आजपासूनच आपण त्याची सुरुवात करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले तर आभार डॉ. अंकुश सरगर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रूपाली कांबळे यांनी व तांत्रिक साह्य प्रा. मंगेश गावित यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment