Header Ads

Loknyay Marathi

वन्यजीवांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी : डॉ.डी. जी. कणसे

वन्यजीवांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी : डॉ.डी. जी. कणसे
सांगली : वन्यजीवांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा सभोवतालच्या एक किंवा अनेक सजीवावर अवलंबून असतो. अन्न साखळीतील प्रत्येक सजीव जगला पाहिजे नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मानवाने अनेक कारणासाठी प्राण्यांची वसतिस्थाने नष्ट केली, त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच कारणामुळे वन्यजीव व मानव यांच्यात संघर्ष होत आहे. यासाठी आता आपण वन्य जीव वाचवण्याचा व संरक्षणाचा विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वन्यजीव संवर्धनासाठी पाऊल उचलले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ डी. जी. कणसे यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग व नेचर क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहातील पोस्टर्स व रांगोळी स्पर्धांप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की भारत देश हा जैवविविधतेने नटलेला आहे. या जैवविविधतेत वन्य प्राणी मानवी जीवनाचा व पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहेत. वन्यजीव संवर्धनाच्या जनजागृतीसाठी समाजामध्ये व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत. 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ प्रभा पाटील यांनी केले,तर आभार श्री नलेश बहिरम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेचर क्लब समन्वयक डॉ. सौ वर्षा कुंभार यांनी केले .या सप्ताहा निमित्त आयोजित रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे परीक्षण कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस. एन. बोऱ्हाडे, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग समन्वयक प्रा. ए. आर. सुपले यांनी केले .यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.