yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा


       सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त भाषा विभागाच्या वतीने लोककलावंत अभिजीत कदम यांच्या ‘लोककला रंगे, अभिजीत संगे’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. या वेळी अभिजीत कदम यांनी मराठी भाषा आणि लोकसाहित्य यांच्या अतूट संबंधाविषयी माहिती सांगितली. त्याचबरोबर वासुदेव, पिंगळा, जात्यावरच्या ओव्या, पोतराज, भारूड, गोंधळ, बहुरूपी, पोवाडा, लावणी या लोककलांचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी लोककला आणि लोकसाहित्याचे महत्त्व सांगून त्यांची परंपरा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी या लोकसाहित्याचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सादर केलेल्या कलाप्रकारांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘मराठी भाषा ही अनेक बोलींनी समृद्ध झाली आहे. आज मरठीत अनेक बोलीभाषांमध्ये साहित्याची निर्मिती होत आहे. मराठी भाषा आणि साहित्याचा इतिहास पाहता संतांनी, लोककलावंतांनी आणि लेखक कवींनी आपल्या परीने योगदान दिलेले आहे. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आज सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण वाचनाकडे दुर्लक्ष करत आहोत ही खंत जाणवताना दिसते. मराठी भाषा आणि साहित्याचा विकास घडवून आणायचा असेल तर वाचन, लेखन आणि संशोधन झाले पाहिजे.’

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. कृष्णा भवारी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नरेश पवार यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. रवींद्र काटकर, व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख डॉ. आनंदा सपकाळ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)