एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र परीक्षेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र परीक्षेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
सांगली : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या एम.एस्सी. जनरल सूक्ष्मजीवशास्त्र (२०२४–२५) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मेरिट यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यामध्ये भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील पाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मेरिटमध्ये स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या पहिल्या दहामध्ये एका महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी असणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा अभ्यासक्रम एकूण नऊ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. या स्पर्धात्मक वातावरणात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता दाखवत मेरिट यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
मेरिट यादीत पुढील विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे : कु. रागिणी केवट (४ था), कु. स्मिता घारगे (५ वा), श्री. सौरभ जाधव (५ वा), कु. अलिशा मुजावर (७ वा) आणि कु. सिमरन हिंगणे (९ वा). या सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख कु. भारती भाविकट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या यशाबद्दल विभागातील सर्व प्राध्यापकांचेही कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी झळाळी प्राप्त झाली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment