yuva MAharashtra स्नेहसंमेलन हा स्नेहाचा आणि कर्त्तृत्वाचा विजयोत्सव: डॉ. मच्छिंद्र सकटे - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

स्नेहसंमेलन हा स्नेहाचा आणि कर्त्तृत्वाचा विजयोत्सव: डॉ. मच्छिंद्र सकटे

 स्नेहसंमेलन हा स्नेहाचा आणि कर्त्तृत्वाचा विजयोत्सव: डॉ. मच्छिंद्र सकटे

(डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न)






सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन २०२५–२०२६ अंतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सकाळी फिशपॉंडचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कु. विभावरी फिरमे हिच्या स्वागतगीताने झाली.

      या कार्यक्रमासाठी प्रा. मच्छिंद्र सकटे (माजी अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ) तसेच डॉ. मनाल अंथिकट (विजेती – 70.3 आयर्न मॅन 2025 व 50K अल्ट्रा मॅरेथॉन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे होते. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, स्नेहसंमेलन २०२६ चे चेअरमन प्रा. अरुण जाधव, डॉ. अमर तुपे, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. रवींद्र काटकर, प्रा. प्रविण बिरुमले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

     यानंतर प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

    पुढे बोलताना प्राचार्य डॉ. रणखांबे म्हणाले की, जोडलेली नाती ही गुणां सोबतच दोषांचेही आदान-प्रदान करतात; मात्र रक्ताने जोडलेली नाती ही नेहमीच फक्त गुणांचे आदान-प्रदान करतात. म्हणूनच समाजात सकारात्मक नाती जोडून परस्परांतील गुणांचा विकास करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

     यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे तसेच परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यश संपादन करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. ज्यांना पारितोषिके मिळाली त्यांनी पुढे अधिक जबाबदारीने कार्य करून अधिक उच्च प्रतीचे यश संपादन करावे, तर ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता नव्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

   तर प्राध्यापिका डॉ. मनाल अंथिकट यांनी आपल्या प्रेरणादायी अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांचे कौतुक केले. शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही मोठी कामगिरी साध्य करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   या प्रसंगी वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी तसेच संशोधक प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमाचे स्वागत उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले. वरिष्ठ विभागाचा अहवाल जिमखाना विभागप्रमुख डॉ. अमर तुपे यांनी सादर केला, तर कनिष्ठ विभागाचा अहवाल स्नेहसंमेलन चेअरमन प्रा. अरुण जाधव यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वंदना सातपुते यांनी केले.

   यानंतर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेश पवार व डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

       या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)