Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एम. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे उद्घाटन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एम. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे उद्घाटन


सांगली, दि. 20/10/2022
येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एम. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे उद्घाटन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून या विभागाचे पहिले विभागप्रमुख आणि सध्या डी. आय. ए. टी. चे प्राध्यापक असलेले डॉ. मुकुंद बोधनकर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाची शैक्षणिक वाटचाल, डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य, वेळेचे महत्त्व व व्यवस्थापन, विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून आवश्यक वाचन, प्रकल्प इत्यादीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीबद्दल मा. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे अभिनंदन केले.


सन्माननीय पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस चे डीन व प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सबल, सशक्त असले पाहिजे, कारण दुर्बलांना सहसा यश मिळत नाही. डोळे व कान उघडे ठेवून निसर्गाकडे पाहिल्यास आपल्याला अनेक गोष्टींचे कुतूहल वाटते, त्यातूनच संशोधनाचे विषय मिळतात. विद्यार्थ्याने चिकित्सक अभ्यास केल्यास देशात अनेक संशोधक निर्माण होतील असे सांगितले. यु. जी. सी. ने अनेक गोष्टीत बदल केला आहे ज्यायोगे मुले एकाचवेळी दोन पदव्या घेवू शकतात. अनेकदा प्रवेशित होऊन बाहेर जाऊ शकतात. हे सर्व बदल विद्यार्थीकेंद्रीत आहेत. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेवून थांबू नये तर संशोधनाला प्राधान्य द्यावे असेही ते म्हणाले.


अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले, की महाविद्यालयाने सर्व क्षेत्रात मिळविलेले यश, डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाने होत असलेली प्रगतिशील वाटचाल याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सूक्ष्म जीवशास्त्र विभागामार्फत पोस्टर प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी मान्यवरांनी पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विभागप्रमुख प्रा. कु. भारती भाविकट्टी यांनी सर्वाचे स्वागत केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. संजीवनी भेडसे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संमृद्धी लवटे यांनी आभार मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)