अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजप्रबोधनाची नितांत गरज: नंदिनी जाधव
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजप्रबोधनाची नितांत गरज: नंदिनी जाधव
सांगली: अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड असून एकविसाव्या शतकातही समाज जादूटोणा, बुवाबा गाजी, कर्मकांड असल्या भाकड गोष्टींवर विश्वास करतो. त्यामुळेच नरबळीसारख्या घटना आसपास घडताना दिसून येतात. अस्वच्छतेमुळे डोक्यात तयार होणाऱ्या जटेकडेही अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यासाठीच समाज प्रबोधनाची नितांत गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज' या विषयावरील व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. यावेळी व्यासपीठावर जयसिंगपूर नगरपरिषदेच्या नगरसेविका अनुराधा आडके उपस्थित होत्या.
पुढे बोलताना जाधव म्हणाल्या की अंधश्रद्धामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अंगात येणे हा हिस्टोरियाचा प्रकार असतो. केसात जट झाली की महिलांना अनेक शुभ कार्यापासून दूर ठेवले जाते. स्त्रियांचे बाह्य सौंदर्य वाढवण्यापेक्षा आंतरिक सौंदर्य मला अधिक महत्त्वाचे वाटते असेही प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काही प्रात्यक्षिके देखील करून दाखविली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की समाजाने जादूटोणा,बुवाबाजी अशा प्रथांना बळी न पडता विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवावा. जोतिष, कुंडली यावर विसंबून न राहता स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा.
यावेळी कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, प्रा. ए. एल. जाधव व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रूपाली कांबळे यांनी केले. आभार डॉ.अंकुश सरगर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment