yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यशाळा उत्साहात संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यशाळा उत्साहात संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात  जिल्हास्तरीय युवा महोत्सव  कार्यशाळा उत्साहात संपन्न












सांगली : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, विद्यार्थी विकास विभाग आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली  यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय युवा महोत्सव  कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते. उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठ, विकास विभागाचे संचालक डॉ. एस. जी. घाणे तर स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली जिल्हा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एस. डी. जाधव, तसेच  शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. संजय परमणे, श्री. विशाल गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाच्या सहाय्यक अधीक्षक सुरेखा आडके, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. रुपाली कांबळे आदी  मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. या प्रसंगी त्यांनी महाविद्यालयाचा इतिहास, युवा महोत्सवाची परंपरा, कार्यशाळेचे उद्देश आणि महत्त्व थोडक्यात स्पष्ट केले.

       अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. डी. आर. मोरे म्हणाले की, ‘युवा महोत्सव हा केवळ सांस्कृतिक स्पर्धांचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे प्रभावी आणि हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहन दिले पाहिज.’

    डॉ. एस. जी. घाणे यांनी यावेळी युवा महोत्सवातील विविध स्पर्धांचे नियम, नोंदणी प्रक्रिया, मूल्यमापन निकष, वेळापत्रक आणि तांत्रिक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धांमध्ये दर्जेदार सादरीकरणासाठी नियोजन, नियमित सराव आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी. जाधव यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा कारण अशाप्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. आजपर्यंत युवा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडले आहेत. आजपर्यंत शिवाजी विद्यापीठातर्फे अनेक कलाकारांनी इंद्रधनुष्य, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर केली आहे.

    दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत एकूण पाच विभागांत होणाऱ्या या स्पर्धेत ३५ कला प्रकाराविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याप्रसंगी डॉ. प्रमोद पाटील, सुरेखा आडके आणि त्यांच्या तज्ज्ञ सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

    या कार्यशाळेला सांगली जिल्ह्यातील एकूण ५२ महाविद्यालयातील ३१६ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केली तर आभारप्रदर्शन डॉ. रुपाली कांबळे यांनी केले. कार्यशाळेच्या समारोप सत्रात आर्य कुलकर्णी आणि विभावरी फिरमे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्राचे वितरण करण्यात आले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर फड यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)