yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सायबर सुरक्षा व पोक्सो कायद्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सायबर सुरक्षा व पोक्सो कायद्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सायबर सुरक्षा व पोक्सो कायद्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन






सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील ‘महिला विकास समिती’ व ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा विवेकपूर्ण वापर आणि पोक्सो (POCSO) कायदा या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमात सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सौ. रेश्मा खोत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. ऑनलाइन फसवणूक, बनावट वेबसाईट व लिंक, ओटीपी किंवा बँकिंग माहिती शेअर करण्याचे धोके, सोशल मीडियावरील अफवा व दिशाभूल करणाऱ्या पोस्टपासून सावध राहणे, सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी कशी घ्यावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी पोक्सो (Protection of Children from Sexual Offences) कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती देत अल्पवयीन मुला-मुलींचे कायदेशीर संरक्षण, लैंगिक अत्याचारासंदर्भातील शिक्षा, पीडितांना मिळणारे संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि अशा घटनांमध्ये तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण, संशोधन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा, सोशल मीडियावर कोणतीही माहिती सत्यता पडताळल्याशिवाय प्रसारित करू नये, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा तसेच सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहून स्वतःबरोबरच समाजालाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, कायदेविषयक जागरूकता आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र काटकर यांनी मानले.

या जनजागृती कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)