Header Ads

Loknyay Marathi

गुणवत्ते शिवाय कोणतेच नाणे जगामध्ये चालणार नाही याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी : लोकप्रिय हास्यकवी अशोक नायगावकर

गुणवत्ते शिवाय कोणतेच नाणे जगामध्ये चालणार नाही याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी : लोकप्रिय हास्यकवी अशोक नायगावकर


सांगली:-  विविध शाखांतील ज्ञान संपादन करण्यासाठी आज अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे पूर्वीच्या पेक्षा आजची पिढी खूप भाग्यवान आहे. भारत देश या जगामध्ये पहिल्या नंबरला पाहिजे  हे भान  मनामध्ये ठेवून विद्यार्थ्यांनी ज्या शाखेचा अभ्यास स्वीकारला आहे त्याच्यामध्ये तन-मन-धन अर्पण करून कार्य केले पाहिजे.


आधुनिक जगाची पाऊले पडत चालली आहेत. जागतिक स्वरूपाचे कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जीव ओतून कार्य केले पाहिजे. गुणवत्ते शिवाय कोणतेच नाणे या जगामध्ये चालणार नाही याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक ज्ञानभारती साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष लोकप्रिय हास्यकवी लेखक अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले.


येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाचव्या ज्ञानभारती साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  अशोक नायगावकर बोलत होते.  दीपप्रज्वलन  व स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून ज्ञानभारती साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 

उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारती विद्यापीठाचे मानद संचालक  डॉ. एच. एम. कदम,जेष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे डॉ. रणधीर शिंदे, कवी व साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील,प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, कवयित्री सौ. प्रतिभा जगदाळे, प्रा. टी. आर. सावंत, डॉ. एस. एन. बोऱ्हाडे,  डॉ. कृष्णा भवारी,डॉ. अमित सुफले, डॉ. संतोष माने, प्रा.अरुण जाधव आदी उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात संमेलन अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी यावेळी हॉवर्ड, ऑक्सफर्ड, केब्रीज विद्यापीठाप्रमाणे पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संकुलं निर्माण केली आहेत. रचनात्मक कार्यातून जागतिक पातळीवर कर्तृत्व निर्माण करणारे पतंगराव कदम हे अलौकिक नेतृत्व असल्याचे नायगावकरांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, कवितेच्या सादरीकरणानिमित्त मी परदेशात गेलो होतो तेथे इस्लामपूर, सांगलीची मराठी मुलं भेटली. महाराष्ट्रीयन जेवण परदेशात विविध हॉटेलमध्ये मिळते. त्यांचे कार्य पाहून खूप अभिमान वाटला. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी जगभर जावे पण मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी अपेक्षा नायगावकर यांनी यावेळी व्यक्त केली. 

अशोक नायगावकर यांनी त्यांच्या खास नायगावकरी,शैलीत सध्याच्या समाजातील वास्तव मॅड वातावरणावर बोट ठेवलं.  ‘सध्या चेष्टा युग सुरू आहे. मॅड लोकांमध्ये राहतो की काय असं वाटावं, असा काळ आहे. कुणाचं खरं आणि खोटं हेच कळत नाही. जीवनाचा चोथा झालाय की काय असं अवतीभोवती विडंबन झाले आहे. सुसंस्कृत समाज बनविण्याचे कार्य साहित्य करीत असते.साहित्यातून बुद्ध्यांका बरोबर भावनांक वाढत असल्याकारणानं साहित्याचे सखोलपणे वाचन केले पाहिजे. साहित्यामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध बनते व  साहित्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवनाचा अर्थ समजतो. वाचनाने संस्कृती सुधारते.   समाजातील तफावत दूर करण्यासाठी तसेच समृद्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्जनशील होऊन साहित्याची परंपरा जपली पाहिजे असे आव्हान नायगावकरांनी यावेळी केले.
  
भारताची नाळ ही एकत्र कुटुंब पद्धतीत आहे. त्याची सूत्रे महिलांच्या हातात आहेत, असे सांगत यावेळी नायगावकर यांनी कवितांच्या माध्यमातून देशाची सध्याची परिस्थिती सांगितली. त्यांनी 'निवृत्तीनंतर,' ‘उजाडतय’, ‘बहिणाबाईंचा बदलता जमाना’, ‘मिळवती’ अशा कवितांच्या माध्यमातून महिलांचे आपल्या आयुष्यातील स्थान, स्वयंपाक घराशी तिचे असणारे नाते, घरची कामे, ऑफिस वर्क करूनदेखील तिची कलात्मकता याचे वर्णन केले. सामाजिक कवितादेखील त्यांनी सादर केल्या. यावेळी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्यांच्या या किश्यांवर सभागृहात एकच हास्यकलोळ झाला.
उपरोधाचा फार सुरेख वापर करत त्यांनी आपल्या हास्य कविता सादर केल्या. 'शाकाहार' या आपल्या गमतीशीर कवितेने त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

प्रारंभी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रास्तविक व स्वागत  करताना भारती विद्यापीठ व महाविद्यालयाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांची माहिती विशाद करत डॉ. पतंगराव कदम व डॉ. विश्वजित  कदम यांच्या वैशिष्टय़पूर्ण कार्याची माहिती यावेळी सांगितली. भारती विद्यापीठ वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून साहित्य चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न करीत 
असल्याचे सांगत डॉ. कणसे यांनी विद्यार्थ्यांच्यात साहित्य विषयी आवड निर्माण होण्यासाठी संमेलन भरवण्याचा उद्देश स्पष्ट केला.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, महाराष्ट्रात फक्त दोनच महाविद्यालयांमध्ये साहित्य संमेलने भरवली जातात त्यापैकी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे एक आहे. निखळ ज्ञानासाठी विद्यार्थी भविष्यात कसा उत्सुक होईल याकरिता साहित्याबद्दल आस्था व चळवळ निर्माण करण्याचे कार्य डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करीत आहे. पतंगराव कदम यांच्या लोकोउपासना आणि ज्ञानोपासना या अलौकिक कार्याचा वारसा हे महाविद्यालय जपत आहे. याचा मला साहित्यिक म्हणून सार्थ अभिमान वाटतो. जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने भारती विद्यापीठाचे मानद संचालक  डॉ. एच. एम. कदम यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
महाविद्यालयाच्या वतीने संपादित केलेल्या 'आई नावाचं गाव' या पुस्तकाचं तसेच 'ज्ञानभारती' नियतकालिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पाचव्या ज्ञानभारती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी, इंग्रजी व हिन्दी  भितीपत्राकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. भारती भावीकट्टी तर आभार प्रा. टी. आर. सावंत यांनी केले.
         
दुपार सत्रात प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 'स्वातंत्र्य भारताचा अमृत महोत्सव: साहित्य व समाज' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये प्रा.डॉ. रणधीर शिंदे, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. मिलिंद जोशी यांनी सहभाग घेतला. तसेच साहित्यिका प्रतिमा जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यामध्ये अनेक मान्यवर कवींनी काव्यवाचन केले. तर साहित्य संमेलनाचा समारोप प्रा. डॉ. सुनीता बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ, व्होकेशनल  विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच साहित्य प्रेमी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)