स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराला रोखायचे असेल तर न्यायव्यवस्थेला मदत करणे गरजेचे: प्रवीण नरडेले
स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराला रोखायचे असेल तर न्यायव्यवस्थेला मदत करणे गरजेचे: प्रवीण नरडेले
सांगली : स्त्री अत्याचाराच्या विरोधात अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत. या कायद्यांची सखोल माहिती आजच्या मुला-मुलींना असायला पाहिजे. स्त्रियांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. त्याबरोबर अन्यायाला रोखायचे असेल तर न्यायव्यवस्थेला मदत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश प्रवीण नरडेले यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, 'मुलींना कायद्याची माहिती देण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबविले आहे. भारतीय राज्यघटनेत वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदी आहेत, महिलांसाठी 'मनोधैर्य योजना' ही योजना महाराष्ट्रात राबवली जाते. सर्वसामान्य लोकांना चांगले जगता यावे, तसेच सुजाण नागरिक बनवणे, कायदे संबंधित योजनेची माहिती देऊन यातून सर्वांना न्याय देणे, सुव्यवस्था राखणे, ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची उद्दिष्टे आहेत. वरील उद्दिष्टे सफल होण्यासाठी न्यायव्यवस्थेला मदत करा त्यामुळे समाजाला मदत होईल,'असे आवाहन केले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे अध्यक्षस्थानी होते. आपल्या संदेशात ते म्हणाले की, 'महिला सुरक्षिततेसाठी सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, सर्वांना कायद्याचे ज्ञान असले पाहिजे, त्यासाठी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, मानवतेचे गुण जपले पाहिजेत, तरच भारत देश विश्वगुरू होईल.'
या शिबिरात ॲड. मुक्ता दुबे यांनी राष्ट्रीय बालिका दिन या विषयावर मार्गदर्शन केले. मुलींना लिंगाधारित भेदभाव न करता दर्जा व संधी यांची समानता दिल्यास देश वेगाने प्रगती करेल. मुलींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे त्यांना फुलू द्या असे आवाहन त्यांनी केले.ॲड.फारुक कोतवाल यांनी पॉक्सो कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. मुलामुलींनी पालकांचे ऐकावे, शिक्षकांना मान देवून अभ्यासात लक्ष द्यावे, मोबाईल व सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळावे असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली सदस्य विजय कोगनोळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सेवानिवृत्त प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन प्रा. सौ.भारती भाविकट्टी यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सुलभा तांबडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment