अंतराळात राहण्याचा ख्रिस्तीना कोचने केला विक्रम...अन् ३२८ दिवसांनी परतली पृथ्वीवर!
ख्रिस्तीना कोच (Christina Koch)
दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रम अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तीना कोच हिने आज केला. तब्बल ३२८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहून ती आज सुखरूपपणे पृथ्वीवर परतली.
कझाकिस्तानच्या डझहेजझगन स्थानकावर गुरुवारी स्थानिक वेळेनुसार पाहते ४.१२ वाजता ख्रिस्तीना परतली. या वेळी तिच्या समवेत रशियाचे सोयुझ कमांडर अलेक्झांडर स्काव्होत्सोव आणि युरोपचे अंतराळवीर लुका पारमिटनो होते. ख्रीस्तीनाने अंतराळात ३२८ दिवस व्यतीत करण्याबरोबरच पृथ्वीला तिने ५२४८ वेळेस प्रद्षिणा घातल्या आहेत. यासाठी तिने ८.५२ कोटी मैलाचे अंतर पार केले आहे. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यामध्ये २९१ फेऱ्या मारण्याएवढे आहे. गेल्या ११ महिन्यात तिने ६ वेळा स्पेस वॉक केले आहे; त्यावेळी ती एकूण ४२ तास १५ मिनिटे स्थानकाबाहेर होती, अशी माहिती नासाने दिली आहे.
अंतराळ स्थानकातील आपल्या वास्तव्यादरम्यान तिने अनेक शास्त्रीय प्रयोग केले. या मोहिमेचा मुख्य उद्देश भविष्यातील चंद्र आणि मंगल अभियानाबरोबरच गुरुत्वाकर्षण आणि अवकाशातील किरणोत्सर्ग याचा महिलांच्या शरीरावर पडणारा प्रभाव, याचा अभ्यास करणे हा होता.
ख्रिस्तीना कोचचा जन्म अमेरिकेतील मिशिगन येथील आहे. तिने नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी येथून इलेक्ट्रिकलची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ख्रिस्तीनाची नासा साठी २०१३ मध्ये निवड झाली होती. २०१५ मध्ये तिने अंतराळवीराचे प्रशिक्षण पूर्ण केले.
Post a Comment