yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी


सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या हस्ते समाजसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

    प्राचार्य प्रा. (डॉ.) रणखांबे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा जोतीराव फुले यांच्या समाजसुधारक कार्याचा आढावा घेत, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या विचारांची आजच्या काळातही असलेली उपयुक्तता अधोरेखित केली. समाजात समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत व्यक्त केले.

    इंग्रजी विभागाचे डॉ. नरेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महात्मा जोतीराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले विचारवंत होते. त्यांनी स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण आणि अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांत क्रांतिकारी कार्य केले. समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

       ते पुढे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगातही महात्मा फुले यांचे विचार अत्यंत सुसंगत आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा संदेश प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यापुरते शिक्षण न घेता, समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करावा तसेच, महात्मा फुले यांनी उभारलेला सत्यशोधक विचार आजच्या पिढीला सामाजिक समतेची जाणीव करून देतो. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी समाजात बंधुता, समता आणि मानवतेची मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

     सदर कार्यक्रमास सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांच्यासह महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

    हा कार्यक्रम प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)