डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये ग्रंथालय, भाषा, एन.सी.सी. आणि एन.एस.एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थोर शास्त्रज्ञ, मिसाईलमॅन, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान उद्देशिका, मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याचे सामूहिक वाचन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे, माजी प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही.पोरे, उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शिक्षण महर्षी डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे यांनी ‘काहीतरी वाचू आणि काहीतरी लिखाण करू’ असा संदेश सर्व
उपस्थितांना दिला. आपण का वाचावे आणि काय वाचावे? याबद्दलही आपले मनोगत व्यक्त
केले. वाचनाने माणूस समृद्ध होतो. पुस्तकांमुळे माणूस
एकमेकाला जोडला जातो. माणूस म्हणून जगताना जगण्याचे मर्म त्याला समजते. वाट्याला
आल्याली सुखदुःखे तो वाटून घेवू शकतो, अशी प्रतिक्रिया डॉ. कृष्णा भवारी यांच्या
मातेरं आणि इधोस या पुस्तकांवर दिली.
शून्यातून
विश्व निर्माण करणाऱ्या काही थोड्याच व्यक्ती असतात, त्यामध्ये आपल्या वंदनीय,
पूजनीय डॉ. पतंगराव कदम साहेबांचे नांव घेता येईल. डॉ. ए. पी. जे. अब्दुल
कलाम यांचा जीवनपट आणि आदरणीय साहेबांचा जीवनपट, त्यांच्या विचारातील समानता,
त्यांची कामाची पद्धत, त्यांच्या जीवनातील संघर्ष, घडलेल्या सर्व घडामोडी यातून आपण
आदर्श घ्यावा व दूरदृष्टीने ग्रंथाकडे पाहावे. ज्ञानाचे प्रतिक असणाऱ्या सरस्वती
मातेला आठवावे आणि ‘वाचाल तर वाचाल!’ ही म्हण अंगीकारावी, असा संदेश प्राचार्यांनी
आपल्या ‘ग्रंथ’ या कवितेतून दिला.
“जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे
राष्ट्र कोंडले जाते. ग्रंथांमधून भरपूर काही शिकता येते. ग्रंथांना जर आपण
माणसांसारखे भेटत गेलो तर ग्रंथ आपणास पावलोपावली विचारांचे आणि सद्सदविवेक
बुद्धीचे निमंत्रण देतात, असे विचार त्यांनी स्वानुभवातून उपस्थितांसमोर मांडले.
आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेबांकडून प्रेरणा घेवून आपले आयुष्य त्या प्रेरणेने
चैतन्यदायी घडवूया आणि तशी वाटचाल आपण आपल्या महाविद्यालयीन कामापासून करूया,” असे
आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील काही
प्राध्यापक व सेवकांनी उत्स्फूर्तपणे कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
ग्रंथपाल जयश्री हाटकर, सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे व आभार डॉ. महेश कोल्हाळ
यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व
विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रक्षेपण यु-ट्यूब लाईव्ह करण्यात
आले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment