yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एड्स समजून घेताना यावर चर्चासत्र - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एड्स समजून घेताना यावर चर्चासत्र

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एड्स समजून घेताना यावर चर्चासत्र 


येथील भारती विद्यापिठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून एड्स समजून घेताना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्राचे  अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले की, एचआयव्ही सारख्या विषाणूचा व एड्स आजाराचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ करीत असतात.  याची बाधा कशी होते ते सर्व स्वयंसेवकांनी समजून घेवून आजाराच्या उच्चाटनासाठी कार्य केले पाहिजे याकरिता महाविद्यालयीन युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. या आजारात बळी पडण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण हे युवा वर्गाचे आहे असे ते म्हणाले. याचबरोबर पुढे ते म्हणाले की, ही माहिती स्वतः पुरतीच मर्यादित न ठेवता ती माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे हे युवकांचे काम आहे. याचबरोबर त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने राबवलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाकरिता कु. भारती के.भावीकट्टी व डॉ. जी. व्ही. माळी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 

प्रथम सत्रात प्रा.कु.भारती भावीकट्टी यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी रेड रिबन क्लबचा प्रमुख उद्देश सांगितला याचबरोबर त्यांनी एच. आय. व्ही. व एड्स यातील फरक मुलांना समजावून सांगितला. त्याचबरोबर त्यांनी एच. आय. व्ही. चे प्रकार सांगून त्याचा प्रसार कसा रोखता येईल याचा उलगडा केला. एच आय व्ही तसेच एड्स बाधित व्यक्तींशी आपण कसे वागले पाहिजे, त्यांना सामावून घेवून त्यांचा आत्मविश्वास आपण वाढवू शकतो असे त्या म्हणाल्या. द्वितीय सत्रात डॉ. जी. व्हि. माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर मार्गदर्शनात त्यांनी रेड रिबन क्लब ची स्थापना कधी झाली व ते देशभरात कसे कार्यरत आहे याबद्दलची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली. एडस् या शब्दाचा उलगडा मराठीत करून दिला. याचबरोबर त्यांनी सदर आजार कसा पसरतो व त्यासाठी जनजागृती किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले. करोना काळातील आयसोलेशनची आठवण करून दिली व त्याचा मानसिक  परिणाम कसा होतो ते सांगितले.

सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्राच्या विभाग प्रमुख कु. बी. के. भावीकट्टी यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. आरीफ मुलाणी यांनी मानले. सदर कार्यक्रमाकरिता  सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील कु. सपना वेल्हाळ, कु. प्रिया पवार, कु. वैष्णवी पाटील यांनी परिश्रम घेतले.



(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)