डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. पोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह या अनिष्ट समजल्या जाणाऱ्या प्रथांना कायद्याने मान्यता दिली. बहुजन विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्माण करून समाजातील सर्व जाती, धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. आरक्षणाचा कायदा करून समाजामध्ये सामाजिक समता कशी तयार होईल याकडे त्यांनी लक्ष देऊन तशी प्रत्यक्ष कृती केली. तसेच बहुजन समाजाला प्रेरणा देणारे, लोकांच्या समस्या सोडवणारे व आपल्या कृतीतून कार्य करणारे असे एकमेव राजा हे राजर्षी शाहू महाराज होते. कोल्हापूर संस्थानाची विसाव्या वर्षी त्यांनी सूत्रे घेतली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले त्यामुळे बहुजनांची मुले शिक्षित झाली. शाहू महाराजांचा विचार हा दूरदृष्टीचा होता. महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाजसुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे राजर्षी शाहू महाराज होते' असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. रुपाली कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. अरूण जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सातपुते यांनी केले तर आभार प्रा.आर.एस काटकर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment