डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दूरदृष्यप्रणाली मार्फत मा. विजय जोशी यांचे 'संपत्तीचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, स्टाफ अकॅडमी आणि महिला मंच समितीच्या समन्वयक प्रा. भारती भावीकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
'संपत्ती व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान देताना विजय जोशी म्हणाले की, अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेकदा फसवणूक होते. त्याचे कारण गुंतवणुकीबद्दल असलेले अपूर्ण ज्ञान आणि माहितीची कमतरता. कष्टाने मिळवलेल्या संपत्तीची गुंतवणूक कोठे आणि कशी करावी असा जर प्रश्न पडत असेल तर जेथे सुरक्षितता, सुनियोजित व्यवहार अणि सुनिश्चिता असेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.तसेच माणसाजवळ आज गुंतवणूकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु शाश्वत आणि विश्वासार्ह गुंतवणूक कशी करावी याबाबत तो संभ्रमात आहे. आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक होईल यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भागभांडवल म्हणजे काय? भारतीय भांडवली बाजाराची रचना कशी असते, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यातील फरक, विविध फंड यांचा नीट अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर आपले उत्पन्न आणि वय याचा विचार करून दीर्घकाळ गुंतवणूक करायची की अल्पकालीन गुंतवणूक करायची याचाही विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी महिला विकास समितीमार्फत महाविद्यालयातील महिला व मुलींसाठी करियर गायडन्स अँड फायनान्शिअल वेलनेस फोर वुमन या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. सदर वेबिनार मध्ये डॉ. सुनील शर्मा यांनी सर्व महिलांना बचत,बचतीचे विविध पर्याय, कमी आणि जास्त धोका असणारे बचतीचे मार्ग, सोन्यातील गुंतवणूक इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे म्हणाले की, भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी या महाविद्यालयाची स्थापना कोणत्या उद्देशाने केली आहे, याचा सारासार विचार करून प्रत्येकाने त्या दृष्टीने महाविद्यालयाचा विकास उत्तरोत्तर कसा होईल हे पाहिले पाहिजे. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या नावाने असलेले भारती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. आज पर्यंत या महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे, पुढील काळातही हा आलेख असाच वाढत गेला पाहिजे आणि 'गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन' या बोधवाक्यप्रमाणे महाविद्यालयाची भरभराट होवो अशी डॉ. पोरे यांनी सदिच्छा व्यक्त केली.
हे कार्यक्रम 'एक्सलेंस ग्लोबल स्किल्स नवी दिल्ली' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्णा भवारी यांनी केले. तसेच दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले तर आभार डॉ. रूपाली कांबळे केले. सूत्रसंचालन प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले.या कार्यक्रमास डॉ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते, प्रा.जयश्री हटकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment