डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक, शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक, शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आर्ट्स, सायन्स व व्यवसाय शिक्षण विभागातर्फे पालक, शिक्षक सहविचार सभा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक कनिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख प्रा. जाधव ए. एल. यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिकावी यासाठीच डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय स्थापन केले. भारती विद्यापीठाच्या १८७ शाखांद्वारे प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे काम सुरू आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून गरीब मुलं शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ व्हावी यासाठी पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे आवश्यक होते म्हणून या पालक, शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी प्रा. एस. बी. पाटील उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पालक शिक्षक सभेचा मुख्य हेतू पालकांनी लक्षात घ्यायला हवा. टी.व्ही., मोबाईल यांसारख्या साधनांचा वापर कमी करायला हवा. विद्यार्थ्याला घरात अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्याचबरोबर त्याचे आरोग्य उत्तम कसे राहील हे ही पाहिले पाहिजे. व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रा. पी. ए. केंगार यांनी पालकांशी संवाद साधताना म्हणाले की, बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे . बारावीच्या गुणांवरतीच विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपली गुणात्मक वाढ करावी.
पालक शिक्षक सहविचार सभेत पालक प्रतिनिधी मा.अरविंद सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. त्या वेळी ते म्हणाले की, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा व त्याची गुणात्मक वाढ व्हावी यासाठी आमचे प्राध्यापक सतत कार्यरत असतातच पण पालक म्हणून आपली भूमिका काय असावी हे याप्रसंगी समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा महाविद्यालयापेक्षा घरात जास्त वेळ असतो. त्याच्यावर वैयक्तिक लक्ष ठेवणे आणि त्याला अभ्यासासाठी योग्य वातावरण निर्माण करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. असे सुचित केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एच. टी. मुल्ला यांनी केले. या प्रसंगी आर्टस, सायन्स व व्यवसाय शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. ए. एल. जाधव, समन्वयक प्रा. पी. एन. देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर. एस. काटकर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment