डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथे रोजगार कौशल्यांवरील कार्यशाळा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथे रोजगार कौशल्यांवरील कार्यशाळा
सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथे ‘रोजगार कौशल्ये’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन कक्ष व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. विद्यार्थिनींना नोकरी व करिअरच्या दृष्टीने आवश्यक कौशल्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. ए. रणखांबे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थिनींना अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
ही कार्यशाळा महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिंद्रा प्राइड क्लासरूम, नांदी फाउंडेशन, पुणे येथील प्रशिक्षक श्री. मोहन शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी रोजगाराभिमुख कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. संवाद कौशल्य, गटचर्चा, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढविण्याच्या तंत्रांचा त्यांनी सरावासह उलगडा केला. मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, बायोडाटा कसा तयार करावा, देहबोली कशी असावी, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. तसेच उद्योगक्षेत्रातील सध्याच्या अपेक्षा आणि स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आवश्यक गुणांविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. टी. आर. लोहार व समन्वयक प्रा. भारती भाविकट्टी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रात्यक्षिके, संवाद सत्रे आणि प्रश्नोत्तरांमुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी विद्यार्थिनींनी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व भविष्यातील करिअरसाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.या कार्यशाळेत एकूण ५३ विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. समृद्धी पाटील यांनी केले. डॉ. लोहार यांनी आभार प्रदर्शन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)






Post a Comment