yuva MAharashtra भाषा माणसांना जोडणारी जैविक शक्ती : डॉ. तारा भवाळकर - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

भाषा माणसांना जोडणारी जैविक शक्ती : डॉ. तारा भवाळकर

भाषा माणसांना जोडणारी ‘जैविक शक्ती’: डॉ. तारा भवाळकर








(भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘अभिजात भाषा आणि साहित्य: भूत, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न)

सांगली : भारती विद्यापीठचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे “अभिजात भाषा आणि साहित्य : भूत, वर्तमान आणि भविष्य” या विषयावर शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला भारत व परदेशातील एकूण ३२७ अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ अभ्यासक व ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी त्या म्हणाल्या की, मराठी भाषेचे सांस्कृतिक व मानवी मूल्य अधोरेखित केले पाहिजे. भाषा ही जिवंत, जैविक आणि माणसांना जोडणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी महाविद्यालयाच्या कार्याबद्दल आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कौतुक केले.

भाषा ही केवळ अभिमानाची बाब नसून संवाद, संस्कृती आणि माणुसकी जोडणारे प्रभावी साधन आहे, असे सांगत त्यांनी भाषेच्या सातत्यपूर्ण विकासाची गरज अधोरेखित केली.

यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद जोशी यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी विविध सामाजिक आणि साहित्यिक संस्था यांनी दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषदे मार्फत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पत्रमोहीम, लोकचळवळ आणि दिल्लीतील आंदोलन यांसारखे प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारती विद्यापीठ आणि संस्थापक पतंगराव कदम यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, तसेच भारती विद्यापीठाने साहित्य व सांस्कृतिक कार्याला दिलेल्या पाठबळाचा विशेष उल्लेख केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आत्मचिंतन आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी मराठीला अपेक्षित निधी आणि शासकीय पाठबळ मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून उद्योग, विज्ञान आणि व्यवहाराचीही भाषा झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी मार्गदर्शन केले.

संस्कृत ही देववाणी असेल तर मराठी ही संतवाणी आहे, मराठी भाषेची परंपरा संत साहित्यापासून सुरू होते. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’सारख्या ग्रंथातून मराठीला तत्त्वज्ञानाची उंची दिली. वारकरी संप्रदायाने अभंग, कीर्तन आणि दिंडी परंपरेतून मराठीचा प्रसार केला. त्यामुळे मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृतीची आणि अध्यात्माची भाषा ठरली.

इतिहासात लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ या वृत्तपत्रातून मराठी पत्रकारितेला बळ दिले आणि स्वातंत्र्यलढ्यात भाषेचे सामर्थ्य दाखवून दिले. राज्यकारभार, न्यायालयीन कामकाज आणि प्रशासनातही मराठी सक्षमपणे वापरली जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले.

परिषदेत असे मत मांडले गेले की, भाषा टिकवण्यासाठी ती बदलत्या काळानुसार विकसित झाली पाहिजे. संस्कृत, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमधील चांगले शब्द आत्मसात करून मराठी समृद्ध झाली आहे. भाषा ही केवळ परंपरेचे नव्हे तर जगण्याचे आणि भविष्य घडविण्याचे साधन आहे.

एकूणच, या परिषदेत मराठी भाषेच्या जतनासोबतच तिच्या आधुनिक विकासाची आणि नव्या युगात संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. अभिजात साहित्य आजपावतो समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे.

कृतज्ञतेच्या भावनेतून नाट्याचार्य श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे पणतू श्री. नितीन खाडिलकर आणि नाट्यशास्त्र व पत्रकारिता या क्षेत्रात योगदान देणारे दैनिक सकाळचे संपादक श्री. शेखर जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

या वेळी ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

भारती विद्यापीठचे कार्यवाह व माजी मंत्री मा. डॉ. विश्वजीत कदम, तसेच शालेय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम,  तसेच डॉ. के. डी. जाधव (सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे) यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.

या परिषदेमध्ये भारतीय व परदेशी अभिजात भाषांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. विशेषत: नायझेरिया येथील सोकोटा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर झैनाब अब्दुल करीम, प्रो. मोहम्मद अलिरीओ, ईस्टर्न युनिव्हर्सिटी श्रीलंका येथील जे. केनेडी यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. भारती भाविकट्टी यांनी सूत्रसंचालन आणि प्राध्यापक (डॉ) जी. व्ही. माळी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

भारतीय अभिजात भाषा सत्रात राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगांव येथील डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी भारतीय अभिजात भाषांची ऐतिहासिक परंपरा मांडली, तर दिल्ली येथील लाल बहादूर शास्त्रीं संस्कृत विश्वविद्यालयातील डॉ. विकास चौधरी यांनी अर्धामागधी अभिजात साहित्याच्या तत्त्वज्ञानात्मक आणि सौंदर्यात्मक मूल्यांवर प्रकाश टाकला.

अभिजात भाषा सत्रात आय.आय.आय.टी तेलंगणाचे श्री. सुबोध कुलकर्णी यांनी १८०५ मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या मराठी व्याकरण ग्रंथापासून ते आजच्या युनिकोड, की-बोर्ड, व्हॉइस टायपिंग, ओसीआर आणि एआयपर्यंत मराठीने मोठा प्रवास केल्याचे सांगितले. मात्र, मराठीतील मोठ्या प्रमाणावरचे साहित्य अजूनही सर्चेबल (युनिकोड) स्वरूपात उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

परिषदेत इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, कॅनडा आणि चीन येथील अभिजात साहित्य अभ्यास परंपरांवर चर्चा झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १९५ प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन निबंध सादर केले.

समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून हैदराबाद येथील इंग्रजीआणि परदेशी भाषा विद्यापीठाच्या (इफ्लू) माजी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) माया पंडित यांनी मार्गदर्शन केले. अशा परिषदांमुळे अभिजात भाषांना नवे व्यासपीठ मिळते आणि नव्या पिढीत अभिजात साहित्याविषयी आवड निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थाना वरून बोलताना वर्तमानातील पिढ्यांची जबाबदारी या बद्दल प्रा. अविनाश सप्रे यांनी दिवसभर झालेल्या परिषदेचा आढावा घेतला. 

याप्रसंगी संशोधक डॉ. सबिया सय्यद, प्रा. डॉ. हेमांगींनी माने यांनी मनोगत व्यक्त केले.

या परिषदेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच सामाजिक शास्त्र विभागातील ३०० हून अधिक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन प्राचार्य प्रा. (डॉ.) विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, डॉ. दादा नाडे, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. रोहिणी वाघमारे, डॉ. नरेश पवार, डॉ. सचिन जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्यामुळे ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या पार पडली.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)