डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत पाटील यांचे 'आजचा युवक व प्रसार माध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. संजय पोरे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगताना डॉ. पाटील म्हणाले की, 'विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यातून राष्ट्राप्रति समर्पित होऊन काम करणारी पिढी निर्माण होते. भारतातील ३२ लाख एन. एस. एस. स्वयंसेवकांपैकी आपण एक आहोत याचा प्रत्येक स्वयंसेवकाने अभिमान बाळगला पाहिजे. या योजनेमुळे कमी वयात समाजसेवेची संधी मिळते हे आपले भाग्य आहे. आजच्या विज्ञान युगात आपल्याला काळानुसार बदलले पाहिजे परंतु प्रसार माध्यमांचा अतिरेक टाळला पाहिजे. पालक, मुलांमध्ये सुसंवाद, धार्मिक व जातीय सलोखा यावरती स्वयंसेवकांनी पथनाट्य, रॅली, परिसंवाद यांच्याद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पोरे म्हणाले की, 'जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगल्यास जीवनात यशस्वी होता येते. माणुसकी धर्म, चांगले संस्कार, कामाप्रति निष्ठा व स्वच्छता या गुणांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम माध्यम आहे.' विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करताना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या वेळी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या कराटे प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. भाग्यश्री बेळगावे व रोहिनी केवट ह्या प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली बेघर निवारा केंद्र याकरिता महाविद्यालयामार्फत धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. विकास आवळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. रुपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. डी. पाखले यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. संजय ठिगळे, प्रा. अरुण जाधव आदी मान्यवरांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment