Header Ads

Loknyay Marathi

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणारी संस्थाच यशाची मानकरी: प्रो. राकेश मुदगल

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणारी संस्थाच यशाची मानकरी: प्रो. राकेश मुदगलडॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 39 वा स्थापना दिन व ओझोन दिन संपन्न


सांगली : एखादी शिक्षण संस्था किती वर्षांची जुनी आहे यापेक्षा ती संस्था आपल्या विद्यार्थ्यांसाठी किती प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करू शकते यावरच तिचे यश अवलंबून असते. या मापदंडानुसार डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नावाजले जात आहे असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलगुरू प्रो. राकेश मुदगल यांनी केले. 

येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या स्थापना दिनानिमित्त व ओझोन दिनानिमित्त 'मोटिवेशन फॉर लर्निंग अँड इंटरॅक्टिव्ह सेशन' या विषयावर 
 
प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे समन्वयक डॉ. आर. एस. पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, उपप्राचार्य व नॅक समन्वयक डॉ. ए. आर. सुपले, वरिष्ठ विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. पी. नाडे आदी उपस्थित होते.  
        
पुढे बोलताना प्रो. मुदगल म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीने खऱ्या अर्थाने साक्षर होणे महत्त्वाचे आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी जीवन समजण्यासाठी जशा आवश्यक आहेत तशाच आपले पाय जमीनीवर राहण्यासाठी सुद्धा गरजेच्या आहेत. सामाजिक परिस्थितीमध्ये  काळानुरूप बदलत होत राहतात. कारण परिवर्तन हे प्रकृतीचे काम आहे. रियल लाईफ आणि रील लाईफ यामध्ये खूप तफावत आहे. विद्यार्थ्यासाठी आपले आई -वडील आणि शिक्षक महत्वपूर्ण आहेत. समाजातील 'चांगले तेवढे' घेण्यासाठी पालक व गुरुजन हे आपले प्रेरक असतात. त्यांनाच आपण आपले आदर्श मानले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 
    
आपल्या अध्यक्षीय संदेशात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, १९८५ साली सुरू झालेल्या महाविद्यालयाने संशोधन, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या  नावाने संस्थेत एकमेव असलेले हे महाविद्यालय आज नावारूपाला आले असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच संशोधनाचेही कार्य या महाविद्यालयात चालू आहे. 
         
प्रारंभी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने भौतिकशास्त्र विभागातर्फे ओझोन दिनाचे औचित्य साधून तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे व रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटनदेखील करण्यात आले.
         
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे  यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख, पूर्वीचे व सध्याचे महाविद्यालय याविषयी काही  आठवणीना उजाळा दिला.  वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार  डॉ. ए. आर. सुपले यांनी मानले.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)