Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवून आणली : प्रा. ऋषिकेश खारगे

डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवून आणली : प्रा. ऋषिकेश खारगे


डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व्याख्यान


सांगली:  डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पूर्व महाराष्ट्राच्या विदर्भात तर डॉ. पतंगराव कदम यांनी पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. या दोन्ही शिक्षणमहर्षीनी मातीशी असलेली आपली नाळ कधीच तोडली नाही. त्यांच्या आचार, विचारांची पाळेमुळे महाराष्ट्राच्या मातीत घट्ट रुजल्यामुळेच त्यांनी गोरगरिबांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून त्यांचे अवघे जीवन प्रकाशमय करून टाकले असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. ऋषिकेश खारगे यांनी केले.

ते येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त आयोजित केलेल्या 'सर्वस्पर्शी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख' या  विषयावरील व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे हे होते. यावेळी व्यासपीठावर जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, सुप्रसिद्ध गझलकार डॉ. राजेश उमाळे, डॉ. रवी गावंडे, डॉ. विनोद कोकणे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 


पुढे बोलताना प्रा. खारगे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी भारतात जपानी तंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न केला. ते स्वतः उच्चविभूषित होतेच त्याचबरोबर त्यांनी आपल्या पत्नीलाही उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच पुढे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. डॉ. पतंगराव कदम यांनी देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदे भूषविली. तेदेखील उच्च विद्याविभूषित होते. त्यांनीही महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था तर डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ ही महाराष्ट्राला व देशाला दिलेली बहुमोल देण आहे असेही ते म्हणाले. या वेळी खारगे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचा समांतर नामोल्लेख करून त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला. या दोन द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा दिवा अखंड तेवत ठेवायचा असेल तर त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा आपण जपला पाहिजे आणि तो समाजापर्यंत पोहोचविलाही पाहिजे असेदेखील त्यांनी सांगितले.
 
अध्यक्षीय भाषणात डॉ. कणसे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. पतंगराव कदम यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली. ते दोघेही पुरोगामी विचारसरणीचे होते. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून त्यांनी समाजाला समतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अतुल बोडखे यांनी केले. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये १२५ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले तर आभार डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)