Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


सांगली: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालयांतर्गत 'मानवी हक्क व मूल्ये' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली‌. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व विषय तज्ज्ञ डॉ. सौ. उर्मिला चव्हाण आणि डॉ. प्रल्हाद माने यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.
      
या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना डॉ.उर्मिला चव्हाण म्हणाल्या की, सध्या जगामध्ये मानवी हक्कांची व मूल्यांची पायमल्ली होत आहे, यातून धार्मिक, जातीय दंगली घडत आहेत. म्हणूनच मानवी हक्क व मूल्ये यांची व्यावहारिकता सर्वांनी जपली पाहिजे. मानवी मूल्ये व्यवहारात आणून नैसर्गिक हक्कांची जोपासना केली तरच खऱ्या अर्थाने मानवी हक्कांचे व मूल्यांचे संवर्धन होईल.
        
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. प्रल्हाद माने म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने मानवी हक्क व मूल्यांबरोबर कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे, समाज निर्भय करण्यासाठी शांततामय धोरणाची सर्वांनाच आवश्यकता आहे. जागतिक शांतता निर्माण करावयाची असेल तर आपल्याला मानवी मूल्यांचा स्वीकार करावाच लागेल.
       
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, मानवाला आपल्या हक्क आणि कर्तव्यांबरोबर जबाबदारीची देखील जाणीव होणे आवश्यक आहे हक्क व मूल्ये मानवी विकासाची नांदी आहे. त्यामुळे सर्वांनीच मानवी मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. नम्रता, जबाबदारी, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, सर्वधर्मसमभाव, श्रमप्रतिष्ठा, संस्कार या मानवी मूल्यांचे पालन करण्यातच मानवाचे हित आहे.
       
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, ज्येष्ठ प्रा. टी. आर. सावंत तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इ. उपस्थित होते.
       
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतिश कांबळे यांनी केले. तसेच या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. वंदना सातपुते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन प्रा.नलेश बहिरम यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. मंगेश गावीत यांनी केले. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)